अबुधाबी – कर्टिस कॅम्फरची अचूक गोलंदाजी व पॉल स्टर्लिंग व गॅरेथ डेनली यांच्या सहजसुंदर फलंदाजीच्या जोरावर आयर्लंडने नेदरलॅंडचा 7 गडी राखून पराभव करत पात्रता साखळी सामन्यांत विजय मिळवला. या विजयाच्या जोरावर आयर्लंडने यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपले आव्हान राखले.
नेदरलॅंडचा कर्णधार पीटर सिल्लरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय साफ चुकला. आयर्लंडच्या कर्टिस कॅम्फरने त्यांच्या फलंदाजांना पाठोपाठ बाद करत त्यांच्या धावसंख्येवर अंकुश लावला. त्याला सुरेख साथ देताना मार्क अडेरने 3 गडी बाद केले.
कॅम्फरने आपल्या एकाच षटकात सलग चार चेंडूत चार फलंदाज बाद करत हॅट्ट्रिकही नोंदवली. नेदरलॅंडकडून मॅक्स ओव्डने अर्धशतकी खेळी केली मात्र, त्याला अन्य फलंदाजांनी साथ मिळाली नाही व त्यांचा डाव 20 षटकांत 106 धावांवर संपला. आयर्लंडकडून कॅम्फरने 4 तर, मार्क अडेरने 3 गडी बाद केले.
विजयासाठी आवश्यक 107 धावा आयर्लंडने 15.1 षटकांत 3 गडी गमावून पूर्ण करत विजय पटकावला. केविन ओब्रायन व अँड्य्रू बिलबिरीन अपयशी ठरले. त्यानंतर आयर्लंडकडून गॅरेथ डेनलीने सर्वाधिक 44 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 29 चेंडूत 5 चौकार व 2 षटकारांची आतषबाजी केली.
पॉल स्टर्लिंगने नाबाद 30 धावांची खेळी करताना 39 चेंडूत 1 चोकार व 1 षटकार फटकावला. डेनलीला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. तो बाद झाल्यावर कॅम्फरने गोलंदाजीप्रमाणे फलंदाजीतही चमक दाखवताना स्टर्लिंगला सुरेख साथ देत नाबाद 7 धावा करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.