बगदाद – इराकचे पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांनी दिलेला राजीनामा इराकच्या संसदेने मंजूर केला आहे. इराकमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या आणि सामाजिक असंतोषाच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधानांनी राजीनामा दिला आहे. या आंदोलनादरम्यान आतापर्यंत 420 जण ठार झाले आहेत आणि हजारो जण आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनामध्ये झालेल्या जिवीतहानीमुळे आपण राजीनामा देणार असल्याचे पंतप्रधान अदेल अब्देल यांनी काल म्हटले होते.
पंतप्रधानांवर अकार्यक्षमता, भ्रष्टाचार आणि विदेशी शक्तींच्या तालावर काम करण्याचा आरोप होत होता. राजधानी बगदादच्या मध्यभागात आंदोलनाने कळस गाठला होता. याशिवाय शिया बहुल दक्षिण आणि सुन्नी बहुल मोसुल शहरात हजारो विद्यार्थ्यांनी काळे कपडे घालून निषेध मोर्चे काढले होते.
रविवारी एका विशेष अधिवेशनामध्ये काही मिनिटातच पंतप्रधान अदेल अब्देल महदी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला. तसेच काळजीवाहू सरकार म्हणून त्यांना काम करण्यास सांगण्याचा ठरावही मंजूर झाला. नवीन पंतप्रधानांची नियुक्ती करावी अशी विनंती आपण अध्यक्ष बरहाम सालेह यांना करणार असल्याचे सभापतींनी सांगितले.
संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होण्यापूर्वी आणखी एका आंदोलकाला गोळी घालून मारण्यात आले.