इस्रायलच्या तेलवाहू जहाजावर इराणचा हल्ला; नेत्यान्याहू यांचा आरोप

जेरुसलेम  – ओमानच्या आखातामध्ये इस्रायलच्या तेलवाहू जहाजावर इराणने हल्ला केल्याचा आरोप इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेत्यान्याहू यांनी केला आहे. इराण हा इस्रायलचा कट्टर विरोधक आहे. त्यामुळे या जहाजावरचा हल्ला इराणनेच केला आहे, याची आपल्याला खात्री आहे, असे नेत्यान्याहू म्हणाले.

इस्रायलच्या मालकीच्या ‘एमव्ही हेलिओस रे’ हे तेलवाहू जहार मध्यपूर्वेतून सिंगापूरला जात असताना या जहाजावर एक गूढ स्फोट झाला. या स्फोटात जहाजावरील कोणीही जखमी झाले नाही. मात्र जहाजाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे या जहाजाला आपला मार्ग बदलून दुबईच्या बंदरात यावे लागले. तेथे या जहाजाची दुरुस्ती करण्यात येत आहे.

मध्यपूर्वेत सागरी मार्गादरम्यान झालेल्या या घटनेमुळे या सागरी मार्गाच्या सुरक्षिततेबाबत साशंकता व्यक्‍त होत आहे. यामुळे या सागरी मार्गाच्या सुरक्षिततेचा आढावा घेतला जाऊ लागला आहे. या तेलवाहू जहाजामध्ये नक्की कशामुळे स्फोट झाला, हे समजू शकलेले नाही.

अलिकडच्या दिवसात, इस्रायलचे संरक्षण मंत्री आणि लष्करप्रमुख या दोघांनाही हल्ल्यासाठी इराणला जबाबदार धरले होते. दरम्यान या हल्ल्याचे प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने दमास्कसच्या दिशेने काही क्षेपणास्त्रेही सोडली. मात्र हवाई संरक्षण यंत्रणेद्वारे बहुतेक क्षेपणास्त्रे हवेतच अडवली गेली. अलिकडच्या काळात इस्रायलचे शेजारील सीरियामधील इराणशी संबंधित अनेक ठिकाणांवर इस्रायलने हवाई हल्ले केलेले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.