डोकेदुखी वाढली! विरोध झुगारून इराणकडून अणुभट्टी उभारण्याचे काम सुरूच

दुबई – अमेरिका आणि अन्य देशांनी सक्त विरोध दर्शवूनही इराणने आपली भूमीगत अणुभट्टी उभारण्याचे काम सुरूच ठेवले आहे. त्या संबंधातील उपग्रह छायाचित्रे असोसिएटेड प्रेसने प्रसारीत केली आहेत. फोर्डो येथे ही अणुभट्टी उभारली जात आहे पण इराण सरकारने ही बाब जाहीर केलेली नाही किंवा त्याला त्यांनी अद्याप पुष्टीही दिलेली नाही.

सन 2009 सालापासून इराणने हा प्रयत्न सुरू केला आहे. नतांज येथेही इराणकडून अण्विक केंद्र उभारले जात आहे. त्या ठिकाणी जुलै महिन्यात एक मोठा स्फोटही झाला होता. फोर्डो येथील अणुभट्टी उभारण्याचे काम पुन्हा सप्टेंबर महिन्यात हाती घेण्यात आल्याचे वृत्त आहे. हे काम तेहरान पासून दक्षिणपश्‍चिमेकडे 90 किमी अंतरावर सुरू आहे.

तेथील बांधकामाचे उपग्रह छायाचित्र 11 डिसेंबर रोजी घेण्यात आले आहे. तेथे डझनभर मोठे पिलर्स उभारण्यात आले असल्याचे छायाचित्रातून दिसत आहे. ही अणुभट्टी इराणच्या पर्वतीय भागात उभारली जात असून या अणुभट्टीवर हवाई हल्ले होऊ नयेत म्हणून ही साईट निश्‍चीत करण्यात आली असावी असे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अमेरिकेने इराणशी सन 2015 साली अणु समझोैता केला होता. पण हा करार ट्रम्प प्रशासनाने सन 2018 मध्ये रद्द केल्यानंतर आता पुन्हा इराणने युरेनियम समद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायाची डोकेदुखी पुन्हा वाढली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.