दुबई – इराणमध्ये दोन कट्टरवादी न्यायाधीशांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. राजधानी तेहरानमध्ये या हत्या करण्यात आल्याचे इराणच्या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. हत्या झालेले दोन्ही न्यायाधीश १९८८ मध्ये इराणमध्ये विरोधकांच्या सामूहिक मृत्यूदंडाच्या प्रकरणात सहभागी होते. मुहम्मद मोघेइसाह आणि अली राझिनी अशी या हत्या झालेल्या न्यायाधीशांची नावे आहेत.
आतापर्यंत कोणत्याही गटाने या हत्यांची जबाबदारी स्वीकारलेली नाही. राझिनी हे १९८८ च्या सामूहिक मृत्यूदंडाच्या प्रकरणात सहभागी असल्याने त्यांना यापुर्वीच लक्ष्य केले जाण्याचा प्रयत्नही झाला होता. त्यांच्यावर १९९९ साली प्राणघातक हल्ला होऊन गेला होता. त्यांच्यावर हातबॉम्ब फेकला गेला होता. त्यातून वाचल्यावर जीवाला धोका असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी न्याय विभागातले काम सोडून दिले होते.
मध्यपूर्वेत इराणचा पाठिंबा असलेल्या गटांना इस्रायलने एकापाठोपाठ एक करत उद्ध्वस्त केले आहे. तसेच इराणमध्ये आर्थिक संकट अधिक गडद व्हायला लागले असताना आणि अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष बनण्याच्या तयारीत असताना या दोन न्यायाधीशांची हत्या करण्यात आली आहे.
हत्या झालेल्या दोन्ही न्यायाधीशांनी इराणमधील सर्वोच्च न्यायालयात काम केले होते, असेही सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गोळीबाराच्यावेळी एका न्यायाधीशाचा अंगरक्षक देखील जखमी झाला. दोन्ही न्यायाधीशांना ठार केल्यानंतर हल्लेखोराने स्वतःला गोळी मारून संपवले, असे वृत्तामध्ये म्हटले आहे.
बनावट खटल्यांमध्ये हजारो जणांना मृत्यूदंड
इराण आणि इराकमधील युद्ध संपल्यानंतर सद्दाम हुसेन यांनी शस्त्रे पुरवलेल्या मुजाहिदीन-ए-खाल्क (एमइके) या गटाने इराणच्या सीमाभागात अचानक हल्ला केला होता. इराणने हा हल्ला हाणून पाडला. मात्र त्यानंतर राजकीय कैदी, दहशतवादी आणि अन्य विरोधी गटांच्या नेत्यांवर पुन्हा बनावट खटले चालवले गेले.
या खटल्यात दोषी ठरवून सुमारे ५ हजार जणांना फाशी दिले गेले. हा आकडा ३० हजार असल्याचा दावा एमइकेकडून केला गेला होता. खोमेनी यांच्या आदेशानुसार या सर्वांना मृत्यूदंड दिला गेला असला तरी इराणने कधीच याची जबाबदारी स्वीकारली नाही.