Iran Earthquake : युद्धाच्या भीषण आगीत होरपळत असलेल्या इराण वर आता निसर्गाचाही प्रकोप कोसळल्याचे चित्र आहे. दक्षिण इराणमधील ‘गेराश’ भागात ४.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला असल्याची माहिती USGS यांनी दिली आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात आले आहे. गेराश हा भाग दक्षिण इराणमधील ऊर्जा प्रकल्प, बंदरे आणि लष्करी तळांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या कॉरिडॉरवर स्थित असल्याने या घटनेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गेराशपासून अंदाजे १५० ते १८० किलोमीटर अंतरावर गचीन युरेनियम खाण आहे. ही खाण इराणच्या प्रमुख युरेनियम स्त्रोतांपैकी एक मानली जाते. तसेच बुशहर अणुऊर्जा प्रकल्प गेराशपासून सुमारे २५० ते ३०० किलोमीटर नैऋत्य दिशेला आहे. सुदैवाने या भूकंपामुळे कोणत्याही अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाल्याची किंवा किरणोत्सर्ग झाल्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, दक्षिण इराणचा हा भाग झाग्रोस पर्वतरांगा परिसराशी जोडलेला असून येथे जमिनीखाली क्षेपणास्त्र साठवणूक व प्रक्षेपण केंद्रे असल्याचे मानले जाते. त्यामुळे या भूकंपाकडे प्रादेशिक सुरक्षेच्या दृष्टीनेही लक्ष लागले आहे.