सौदी : सौदी अरेबियात तेल उत्पादन आस्थापनांवर करण्यात आलेल्या ड्रोन हल्ल्यामध्ये इराणचा सहभाग असल्याचा अमेरिकेचा आरोप इराणने फेटाळला आहे. इराणविरोधात सुडाने कारवाई करण्यासाठी अमेरिका कारण शोधत असल्याचा उलट आरोपही इराणने याच पार्श्वभूमिवर केला आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अब्बास मौसवी यांनी अमेरिकेने आंधळेपणाने केलेले हे आरोप निराधार असून ते अर्थहीन व समजण्यापलीकडे असल्याचे म्हटले आहे.
अमेरिकी परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिओ यांनी इराणचा सौदी अरेबियात आरमको कंपनीच्या तेलक्षेत्रांवर केलेल्या हल्ल्यांबाबत निषेध करताना असे म्हटले होते, की हल्ले येमेनमधून करण्यात आलेल्याचे पुरावे नाहीत. या हल्ल्यांची जबाबदारी इराणचा पाठिंबा असलेल्या शिया हुथी बंडखोरांनी घेतली आहे. पॉम्पिओ यांना मात्र हा हल्ला हुथी बंडखोरांनी केल्याचे मान्य नाही. तर दुसरीकडे मौसवी यांनी सांगितले, की अबाकिक व खुराइस या पूर्व भागातील तेल क्षेत्रांवर पहाटेच्या वेळी हल्ले करण्यात आले होते. ते इराणने केल्याचा आरोप अमेरिकेने केला असला तरी त्यात तथ्य नाही. इराणविरोधात कारवाईसाठी अमेरिका निमित्त शोधत आहे. अमेरिकेचे आरोप म्हणजे गुप्तचर यंत्रणांच्या मार्फत आमच्या देशाचे प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार आहे.