तेहरान – अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इराणने अफगाणिस्तानला जाडणारी एक महत्वाची सीमा बंद केली आहे. तालिबानी हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानातून पळून शेजारच्या देशांमध्ये आश्रय घेणाऱ्यांची संख्या वाढल्याने इराणने ही सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्यपूर्वेतील प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतचे वृत्त दिले आहे.
इराणमधील सिस्तान आणि वलुचिस्तान प्रांतातील डेप्युटी गव्हर्नर महम्मद हदी मार्शी यांनी सरकारी वृत्तसंस्थेला याबाबतची माहिती दिली. अफगाणिस्तान आणि इराण दरम्यानच्या मिलाक जिल्ह्यातील सीमा बंद करण्यात आली आहे. इराणच्या सीमेजवळील झरांज जवळ सुरू असलेल्या जोरदार धुमश्चक्रीमुळे इराणने याबाबतचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानातील नोमरुझ शहर काल रात्री तालिबान्यांच्या ताब्यात पडले. या शहरात तालिबान्यांचा मुक्त संचार सुरू झाला आहे. अफगाणी सैन्याने फेर हल्ला केल्यावर तालिबानने माघार घेतली. सीमेवरील वातावरण सध्या शांत आहे. मात्र राष्ट्रीय हिताचा विचार करुन इराणमधील या प्रांतातील सैन्य, सीमेवरील सुरक्षा दल आणि पोलिसांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे इराणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराण आणि अफगाणिस्तान दरम्यान 921 किलोमीटरची सीमा आहे. अफगाणिस्तानातील युद्धाचा या सीमेवर परिणाम होऊ नये म्हणून ही सीमा बंद करण्यात आली आहे.