अमिरातींच्या जहाजांवरील हल्ल्यांमागे इराणच

अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांचा आरोप

आबु धाबी, (संयुक्‍त अरब अमिराती) – या महिन्याच्या सुरुवातीला संयुक्‍त अरब अमिरातीच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमागे इराणचाच हात असला पाहिजे, असा आरोप अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्ष सल्लागार जॉन बोल्टन यांनी केला आहे. सौदी अरेबियाचे 2 तेलवाहू टॅंकरसह एकूण 4 जहाजांवर सागरी सुरुंगांद्वारे करण्यात आलेले हल्ले इराणकडूनच झाले असावेत, असे बोल्टन यांनी म्हटले आहे. अमिरातीची राजधानी आबुधाबीमध्ये एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ओमानच्या आखातामध्ये फैजुल्लाह जवळ या चार जहाजांवर 12 मे रोजी झालेल्या हल्ल्यांचा तपास 5 देशांच्या तज्ञांकडून केला जात आहे. या पथकामध्ये अमेरिकेच्या तज्ञांचाही समावेश आहे. या हल्ल्यांमागे कोणाचा हात असावा, याबाबत अमेरिकेच्या मनात कोणतीही शंका नाही. दुसऱ्या कोणाच्या नावाबाबत शंकाही घेतली जाऊ शकत नाही. हे अन्य कोण करू शकेल ? नेपाळ असे करेल का ? असे बोल्टन म्हणाले. आबुधाबीचे युवराज शेख मोहम्मद बिन झ्ययेत अल नह्यान यांची आणि युएईचे युवराज शेख तहानउन बिन झायेद अल नह्यान यांची भेट घेऊन प्रादेशिक तणावाबाबत आपण चर्चा करणार असल्याचेही बोल्टन यांनी सांगितले.

जहाजांवरील हल्ल्याचा आरोप हास्यास्पद
अमिरातीच्या जहाजांवर झालेल्या हल्ल्यांमागे इराणचाच हात असल्याचा जॉन बोल्टन यांनी केलेला आरोप इराणने फेटाळून लावला आहे. हा आरोप हास्यास्पद आणि विचित्र आहे, असे इराणचे विदेश मंत्रालयाचे प्रवक्‍ते अब्बास मौसवी यांनी निवेदनामध्ये म्हटले आहे. इराणने सातत्याने संरक्षणात्मक संयम, सतर्क टेहळणी आणि सातत्यपूर्ण संरक्षण सिद्धता राखली आहे. आमच्या भागामध्ये अनागोंदी निर्माण करण्यासाठी कोणत्याही प्रयत्नांना इराण यशस्वी होऊ देणार नाही, असे मोसवी यांनी म्हटले आहे.

या चारही जहाजांवर जेथे हल्ला झाला ते फैजुल्लाह हे तेलनिर्यातीसाठीचे ओमानच्या समुद्रातील प्रमुख केंद्र आहे. येथूनच आखाती सामुद्रामध्ये प्रवेश केला जाऊ शकतो. आखाती सागरी प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या होरमुझ या ठिकाणाला बंद करण्याची धमकी इराणने वारंवार दिली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.