मुंबई – मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आले आहे. ठाकरे सरकारने मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली केली आहे. मुंबईतील करोना रुग्णसंख्या आवरत नसल्याने ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे. प्रवीण परदेशी यांना नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. प्रवीण परदेशी यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई मनपाचे नवे आयुक्त असतील.
मुंबई महापालिका आयुक्तांसह अतिरिक्त आयुक्तांनाही हटवण्यात आले आहे. मुंबई मनपातील अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाडांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी ठाणे मनपाचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबईत करोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानेच प्रवीण परदेशी यांना हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रविण परदेशी यांच्या अनेक निर्णय देखील वादात सापडले होते. त्यांच्या या निर्णयांबद्दल अनेक मंत्र्यांनी तक्रारीही केल्या होत्या. त्यांच्यावर परस्पर निर्णय घेतल्याचाही आरोप होत होता.
प्रविण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहिले आहे. परदेशी यांनी आपल्या 29 वर्षांच्या कार्यकाळात लातूर आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.