#IPLAuction2021 : मॉरिस व मॅक्‍सवेलची कोटीच्या कोटी उड्डाणे

आयपीएल लिलावात मॉरिसवर 16.25 तर मॅक्‍सवेलला 14.25 कोटी मिळाले

चेन्नई – अमिरातीत गेल्या वर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत सातत्याने अपयशी ठरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्‍सवेलच्या नावाची जादू आजही कायम असल्याचेच दिसून आले. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मॅक्‍सवेलने सर्वाधिक किंमत मिळवली. त्याला विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर बेंगळूरूने तब्बल 14.25 कोटी रुपये बोली लावून विकत घेतले. त्याचवेळी अनपेक्षितरीत्या दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू ख्रिस मॉरिस याला राजस्थानने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जास्त रक्कम देत तब्बल 16 कोटी 25 लाख रुपयांत विकत घेतले.

मॅक्‍सवेलची बेस प्राइज यावेळी दोन कोटी रुपये एवढी होती. पण लिलावात जवळपास सर्वच संघांनी मॅक्‍सवेलवर बोली लावली. कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज व कोहलीच्या बेंगळूरू यांच्यात चांगलीच चुरस लागली होती. अखेर 14 कोटी 25 लाख रुपये मोजत बेंगळूरूने मॅक्‍सवेलला आपल्या संघात घेतले.

गेल्यावर्षी मॅक्‍सवेलला चांगली कामगिरी करता आली नव्हती. पण त्यानंतर झालेल्या ऑस्ट्रेलियातील टी-20 मालिकेत मॅक्‍सवेलने धडाकेबाज फलंदाजी केली होती. त्यामुळे यावेळी मॅक्‍सवेलवर सर्वात जास्त बोली लागल्याचे पाहायला मिळाले.

इंग्लंडचा अष्टपैलू मोईन अली याला चेन्नईने तब्बल सात कोटी रुपयांत खरेदी केले. त्याच्यासाठी चेन्नई व पंजाब किंग्जमध्ये लढत झाली. अलीला बेंगळूरूने रिलीज केले होते. त्याची बेसप्राईस दोन कोटी रुपये इतकी होती. संघात सध्या एकही फिरकी गोलंदाज नसल्यामुळे चेन्नईने मोईन अलीला घेतले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील महागडे खेळाडू

युवराजसिंग – 2015 सालच्या लिलावात दिल्लीने 16 कोटी रुपयांत विकत घेतले होते. तसेच 2014 साली देखील युवराजला बेंगळूरूने 14 कोटी रुपयांत खरेदी केले होते.

पॅट कमिन्स – ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स गेल्या वर्षी 15 कोटी 5 लाख रुपयांना कोलकाताने घेतले होते.

बेन स्टोक्‍स – इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोकला 2017 साली 14.5 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते. तसेच त्याला राजस्थानने 2018 साली 12.5 कोटी रुपयांना आपल्याकडे घेतले होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.