मुंबई – आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर बेंगळुरु संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहलीची अपयशी कामगिरी अद्याप कायम राहिली आहे. त्याने या स्पर्धेत एका अर्धशतकासह 216 धावा केल्या असल्या तरीही त्याच्या दर्जानुसार त्याच्याकडून कामगिरी झालेली नाही. त्यातच सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या रविवारी झालेल्या सामन्यात कोहली षटकातील पहिल्याच चेंडूवर खाते उघडण्यापूर्वीच बाद झाला व त्याच्या नावावर गोल्डन डकची नामुष्की नोंदली गेली.
हा सामना बेंगळुरुने जिंकला असला तरीही त्यांच्या विजयापेक्षा कोहलीच्या गोल्डन डकचीच चर्चा जास्त रंगली. मुळातच कोहलीला 2019 सालापासून आतापर्यंत एकही मोठी खेळी करता आलेली नाही. त्याने तब्बल अडीच वर्षांपूर्वी शतकी खेळी केली होती. त्यानंतर अद्याप त्याला शतक साकार करता आलेले नाही. आयपीएल स्पर्धेत शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे.
हैदराबादविरुद्धच्या सामन्यात कोहलीने कर्णधार फाफ डूप्लेसिसह डावाची सुरुवात केली. मात्र, हैदराबादच्या जगदीश सुचिताने टाकलेल्या पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर कोहली केन विल्यमसनकडे झेल देत बाद झाला.
2008 ते 2021 या मोसमात कोहलीला केवळ तीन वेळा गोल्डन डकची नामुष्की पत्करावी लागली होती. मात्र, यंदाच्या एकाच मोसमात तो तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.