पुणे – आयपीएल स्पर्धेतील सलग 4 पराभवांमुळे सनरायझर्स हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशांना धक्का बसला आहे. त्यांच्याकडे 11 सामन्यांत 10 गुण असून प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी शनिवारी(दि.14) कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध “करो या मरो’चा सामना होणार आहे. तसेच त्यांना उर्वरित सर्व सामने जिंकावे लागणार आहेत.
मागील सामन्यांमध्ये सनरायझर्सच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे प्रमुख गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर आणि टी. नटराजन यांची दुखापत ठरले. याशिवाय वेगवान गोलंदाज उमरान मलिकलाही चांगली कामगिरी करता आली नाही. यामुळे विरोधी संघाने सनरायझर्सविरुद्धच्या गेल्या चार सामन्यांत 190 हून अधिक धावा केल्या.
दुसरीकडे सनरायझर्सकडे फलंदाजीत चांगले फलंदाज आहेत. मात्र, कर्णधार केन विल्यमसनला अधिक जबाबदारी पार पाडावी लागणार आहे. त्याला आतापर्यंत केवळ एकच अर्धशतक करता आले आहे. अभिषेक शर्माने संघाला चांगली सुरुवात करून दिली, पण या युवा फलंदाजाला डाव सांभाळता आलेला नाही. राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन आणि ऍडन मार्करामही धावा करत आहेत, पण सनरायझर्सच्या फलंदाजांना गोलंदाजांची साथ हवी आहे.