मुंबई – आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमासाठी दोन नवे संघ दाखल होत असून, त्यांना खेळाडूंना रिटेन करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती आयपीएल नियामक समितीचे संचालक व माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांनी दिली आहे.
यंदाच्या मोसमासाठी आयपीएलचा मेगा लिलाव येत्या 12 आणि 13 फेब्रुवारीला होणार आहे. अहमदाबाद व लखनौ या दोन नवीन संघांना खेळाडू रिटेन करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी वाढवून देण्यात आला आहे.
दरम्यान, आयपीएल नियामक समितीच्या झालेल्या बैठकीत अहमदाबाद संघाचे मालकी हक्क सीव्हीसी समूहाकडेच राहण्यास मान्यताही देण्यात आली आहे. सीव्हीसी समूह एका बेटिंग कंपनीशी आर्थिक व्यवहार करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या.
त्यानंतर बीसीसीआयने याबाबत तपास केला होता. त्यातून अशी कोणतीही पुष्टी झाली नसल्याने त्यांच्याचकडे संघाची मालकी कायम ठेवण्यास मान्यता दिली गेली, असेही पटेल यांनी सांगितले.