मुंबई – आयपीएल 2022 च्या 45 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने दिल्ली कॅपिटल्सचा 6 धावांनी पराभव करत विजय साकारला आहे. टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करताना लखनौने 20 षटकांत तीन विकेट गमावून 195 धावा केल्या. कर्णधार केएल राहुलने सर्वाधिक 77 आणि दीपक हुडाने 52 धावा केल्या. प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 189 धावा करता आल्या.
An elated dugout as @LucknowIPL win by 6 runs against #DelhiCapitals.#TATAIPL #DCvLSG pic.twitter.com/EVagwBHHVA
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2022
सर्वात आधी लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार राहुलने टाॅस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय राहुलने दीपक हुडाच्या मदतीने योग्य असल्याचं सिद्ध केलं. सुरुवातीला डी काॅकने 23 धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. त्यानंतर मात्र राहुल आणि दीपक हुडा यांनी अप्रतिम भागिदारी करत संघाचा स्कोर 100 पार नेला. त्यानंतर दीपक 52 धावा करुन बाद झाला. काही वेळाने राहुलही 77 धावा करुन माघारी परतला. अखेर मार्कस स्टॉयनिसने नाबाद 17 आणि कृणालने नाबाद 9 धावा करत संघाचा स्कोर 20 षटकांत 195 धावांपर्यंत नेला. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने 3 विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात दिल्लीच्या संघाला 20 षटकांत 7 विकेट गमावून केवळ 189 धावा करता आल्या. दिल्लीकडून फलंदाजीत ऋषभ पंतने सर्वाधिक 44, अक्षर पटेलने नाबाद 42 आणि मिचेल मार्शने 37 धावा केल्या. लखनौ सुपर जायंट्सकडून गोलंदाजीत मोहसीन खानने चार षटकात 4 विकेट घेत महत्त्वपूर्ण कामगिरी केली.
या विजयासह लखनौचा संघ 10 सामन्यांपैकी 7 सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. लखनौ संघाचे 14 गुण आहेत. लखनौ संघाने प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत केला आहे. त्याचवेळी दिल्ली संघाचा नऊ सामन्यांतील हा पाचवा पराभव ठरला. आठ गुणांसह दिल्लीचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे.