मुंबई – डावखुरा फिरकी गोलंदाज कुलदीप यादवने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल स्पर्धेतील गुरुवारच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 9 बाद 146 धावांवर रोखले. कोलकाताच्या नितीश राणाचे अर्धशतक व कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंगने केलेल्या उपयुक्त खेळीमुळे कोलकाताला किमान लढत देता येईल अशी धावसंख्या उभारता आली.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंत याने नाणेफेक जिंकत कोलकाताला पहिल्यांदा फलंदाजीसाठी पाचारण केले. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाने सलामीवीर ऍरन फिंचचा त्रिपळा उडवला व दिल्लीला थाटात सुरुवात करून दिली. त्यानंतर भरात असलेल्या व्यंकटेश अय्यरचा अडसर अक्सर पटेलने दूर केला. त्यानंतर लगेचच पंतने चेंडू कुलदीप यादवकडे सोपवला व कुलदीपने लागोपाठच्या चेंडूंवर बाबा इंद्रजीत व सुनील नरेन यांना बाद केले. त्याची हॅट्ट्रिक मात्र पूर्ण होऊ शकली नाही. कर्णधार श्रेयस अय्यरने चांगली लढत देत 37 चेंडूत 4 चौकारांच्या मदतीने 42 धावांची खेळी केली. मात्र, मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला. त्याचदरम्यान नितीश राणाने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत आक्रमक फलंदाजी केली. त्याने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले.
दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करताना मुस्तफिजूर रेहमानने राणाला बाद केले. राणाने आपल्या 57 धावांच्या खेळीत 34 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार फटकावले. त्याला साथ देत रिंकू सिंगने 23 धावांची उपयुक्त खेळी केली. त्याने या खेळीत 16 चेंडूत 3 चौकार फटकावत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. कुलदीप यादवने भरात असलेल्या आंद्रे रसेलला बाद करत सामन्यातील आपला चौथा बळी मिळवला. मुस्तफिजूरने तळात भेदक गोलंदाजी करत 3 गडी बाद केले. कोलकाताचा डाव 20 षटकांत 9 बाद 146 असा रोखला गेला.
संक्षिप्त धावफलक –
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 9 बाद 146 धावा. (नितीश राणा 57, श्रेयस अय्यर 42, रिंकू सिंग 23, कुलदीप यादव 4-14, मुस्तफिजूर रेहमान 3-18, चेतन सकारिया 1-17, अक्सर पटेल 1-28).