शारजा – सुनील नरेनची फसवी लेग स्पीन गोलंदाजी रॉयल चॅलेंजर बेंगळुरूच्या पचनीच पडली नाही व त्यांच्या फलंदाजांनी कोलकाता नाईट रायडर्ससमोर चक्क शरणागती पत्करली. कोलकाताने बेंगळुरूलला 20 षटकांत 7 बाद 138 धावा असे रोखले व अर्धी लढाई जिंकली.
बेंगळुरूचा कर्मधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. त्याने देवदत्त पडीक्कलसह डाव सुरु केला तेव्हा त्यांच्या देहबोलीतून आक्रमक फलंदाजी पाहायला मिळणार असेच वाटत होते. सुरूवातीच्या काही षटकांमध्ये तसेच चित्र उभेही राहिले होते. मात्र, पडीक्कल 18 चेंडूत 2 चौकारांसह 21 धावा काढून बाद झाला आणि ग्लेन मॅक्सवेल वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाने कोहलीला पुरेशी साथ दिली नाही.
यावेळी कोहलीचाही संयम सुटला व सुनील नरेनच्या गोलंदाजीवर ऍक्रॉस द लाईन फटका खेळताना कोहलीचा त्रिफळा उडाला. कोहलीने बेंगळुरूकडून सर्वाधिक 39 धावा केल्या. त्यात त्याने 33 चेंडूत 5 चौकार फटकावले. मॅक्सवेलही 15 धावा काढून परतला. या संपूर्ण स्पर्धेत फारशी चमक दाखवू न शकलेला एबी डीविलियर्स 11 तर, शाहबाद अहमद 13 धावा काढून बाद झाले.
नरेनने आपल्या फसव्या गोलंदाजीच्या जोरावर बेंगळुरूच्या चार प्रमुख फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याला सुरेश साथ देताना लॉकी फर्गुसनने 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक – रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 138 धावा. ( विराट कोहली 39, देवदत्त पडीक्कल 21, ग्लेन मॅक्सवेल 15, शाहबाज अहमद 13, एबी डीविलियर्स 11, सुनील नरेन 4-21, लॉकी फर्गुसन 2-30).