मुंबई -आयपीएल स्पर्धेत धडाक्यात प्रारंभ करणारा दिल्ली संघ नंतर मात्र ढेपाळला. राजस्थानकडून गुरुवारी नाट्यमय पराभव पत्करल्यानंतर आता आज त्यांची पंजाब किंग्जशी लढत होत आहे. अर्थात पंजाब संघाची कामगिरीही फारशी सातत्यपूर्ण नसली तरीही दिल्लीपेक्षा त्यांची बाजू काहीशी वरचढ वाटत आहे.
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ व शिखर धवन यांनी पहिल्या सामन्यात धडाकेबाज फलंदाजी केली. मात्र, राजस्थानविरुद्धच्या सामन्यात हे दोघेही ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहता या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजीवर ते कसे खेळतात यावर संघाचे यश अवलंबून आहे. शॉ व धवन वगळता अजिंक्य रहाणे, मार्कस स्टोनिस हे प्रमुख फलंदाज फारसे भरात नाहीत.
ललित यादवकडून त्यांना रास्त अपेक्षा आहेत. कर्णधार ऋषभ पंतने सातत्य राखले असले तरीही एकट्याच्या बळावर तो सामने जिंकून देऊ शकत नाही. आवेश खान या नवोदित गोलंदाजाने यंदा सरस कामगिरीत सातत्य राखले आहे. त्यातही स्टोनिस, अश्विन व कुरेन यांनीही समर्थपणे जबाबदारी पेलली आहे. अर्थात कुरेनला राजस्थानविरुद्धच्या लढतीत काहीसे अपयश आले असले तरीही टी-20 क्रिकेटमध्ये असे एखाद्या सामन्यात घडू शकते.
दुसरीकडे पंजाबबाबत बोलायचे झाले तर त्यांची फलंदाजी हीच त्यांची खरी ताकद आहे. मात्र, सलामीवीर मयंक आग्रवालला येत असलेले अपयश त्यांची चिंता वाढवणारे ठरत आहे. कर्णधार लोकेश राहुल सातत्यपूर्ण कामगिरी करत असला तरीही त्याला मधल्या फळीत ख्रिस गेल व्यतिरिक्त अन्य कोणाचीही साथ लाभले नाही.
त्या मानाने त्यांची गोलंदाजी कमकुवत बनली आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता त्यांची गोलंदाजी नवखी आहे. अर्शदीप सिंगने राजस्थानविरुद्ध सरस गोलंदाजी केली असली तरीही त्याच्याकडून प्रत्येक सामन्यात तशी अपेक्षा बाळगणे चूक ठरेल. दीपक हुडाकडून राजस्थानविरुद्धच्या सामन्याप्रमाणे कामगिरीची गरज आहे.
अर्थात, हे सगळे चित्र असले तरीही या सर्व प्रमुख फलंदाजांना हैदराबादचा यॉर्कर किंग टी. नटराजनला समर्थपणे सामोरे जावे लागणार आहे. तसेच लेगस्पीनर रशिद खान, जेसन होल्डर यांच्याही गोलंदाजीसमोर टिकाव धरावा लागणार आहे. तसेच प्रमुख गोलंदाज भुवनेश्वर कुमार यंदाच्या स्पर्धेत भरात असल्याने पहिल्या सहा षटकांतील त्याच्या तीन षटकांमध्ये पंजाबला जबाबदारीने फलंदाजी करावी लागणार आहे. एकूणच दोन्ही संघांसाठी हा सामना विजयाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.
सामन्याची वेळ
सायंकाळी : 7.30
ठिकाण ः वानखेडे स्टेडियम, मुंबई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर