अबुधाबी – हार्दिक पंड्या, कॅरन पोलार्ड व सौरभ तिवारी यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर अखेर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयासह मुंबईने सलग तीन पराभवांनंतर विजय मिळवत यंदाच्या आयपीएल स्पर्धेच्या येथे सुरू असलेल्या दुसऱ्या पर्वातील प्ले ऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या आशाही कायम राखल्या आहेत.
विजयासाठी आवश्यक धावांचा पाठलाग करताना मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा अपयशी ठरला. सूर्यकुमार यादवनेही निराशा केली. क्वांटन डीकॉकने चांगली खेळी केली. मात्र, स्थिरावल्यावर तोदेखील अनावश्यक फटका मारून 27 धावांवर बाद झाला. त्यानंतर सौरभ तिवारीने आक्रमक फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले.
मात्र, अर्धशतकाच्या जवळ आल्यावर तो 37 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 45 धावा काढून बाद झाल्याने मुंबईचा डाव संकटात सापडला. यावेळी हार्दिक पंड्या व कॅरन पोलार्ड ही आक्रमक फलंदाजांची जोडगोळी खेळपट्टीवर एकत्र आली व सामन्याचा नूरच पालटला. दोघांनी पंजाबच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला आणि संघाला अत्यंत आवश्यक असलेला विजय मिळवून दिला. पंड्या 30 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांवर नाबाद राहिला, तर पोलार्डने एक षटकार व एक चौकार फटकावताना नाबाद 15 धावा केल्या. पंजाबकडून रवी बिष्णोईने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने पंजाब किंग्जला 6 बाद 135 धावांवर रोखले. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने या मस्टविन सामन्यात नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजी देण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय बुमराह व पोलार्डने योग्य ठरवला. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने मनदीप सिंगच्या साथीत चांगली सुरुवात केली. मात्र, संघाच्या 36 धावा झाल्या असताना मनदीप कृणाल पंड्याच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चांगला खेळत असतानाही राहुल पोलार्डचा बळी ठरला.
पोलार्डने ख्रिस गेल याचाही अडसर दूर केला. त्याचवेळी एडन मार्करमने मात्र एक बाजू लढवत ठेवली. निकोलस पूरनही अपयशी ठरला. त्याला बुमराहने बाद केले. त्यानंतर दीपक हुडाने मार्करमला साथ देत संघाचे शतक फलकावर लावले. मात्र, मार्करम अर्धशतकाजवळ आलेला असताना बाद झाला. त्याने 42 धावांच्या खेळीत 29 चेंडूत 6 चौकार फटकावले. हुडाही चांगला खेळत होता.
त्यालाही बुमराहनेच बाद केले व धावांचा वेग वाढणार नाही याची काळजी घेतली. हरप्रीत ब्रार व नाथन एलिस यांनी संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. मुंबईकडून कॅरन पोलार्ड व जसप्रीत बुमराह यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. कृणाल पंड्या व राहुल चहर यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक –
पंजाब किंग्ज – 20 षटकांत 6 बाद 135 धावा. (एडन मार्करम 42, दीपक हुडा 28, लोकेश राहुल 21, कॅरन पोलार्ड 2-8, जसप्रीत बुमराह 2-24). मुंबई इंडियन्स – 19 षटकांत 4 बाद 137 धावा. (सौरभ तिवारी 45, क्वांटन डीकॉक 27, हार्दिक पंड्या नाबाद 40, कॅरन पोलार्ड नाबाद 15, रवी बिष्णोई 2-45).