चेन्नई -गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर आणि योग्य वेळी घेतलेल्या बळींमुळे कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा अखेरच्या चेंडूपर्यंत झालेल्या रोमहर्षक सामन्यात अवघ्या 10 धावांनी पराभव केला व यंदाच्या आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली.
विजयासाठी 188 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादचा डाव 20 षटकांत 5 बाद 177 धावांवर रोखला गेला. हैदराबादच्या मनीष पांडेने नाबाद 61 धावांची खेळी केली. तसेच त्याला सुरेख साथ देताना जॉनी बेअरस्टोने 55 धावांची खेळी केली. मात्र, महत्वाच्या क्षणी बेअरस्टो बाद झाला व त्यानंतर एकाही फलंदाजाने पांडेला साथ दिली नाही. अब्दूल समदने थोडीफार चमक दाखवली मात्र, त्यांची कामगिरी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही.
तत्पूर्वी, नितिश राणा व दीनेश कार्तिक यांनी केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर कोलकाताला 6 बाद 187 धावा नोंदवता आल्या. रशिद खान व टी. नटराजन यांच्यासह अन्य गोलंदाजांनी केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे कोलकाता एक वेळ द्विशतकी मजल मारेल असे वाटत असतानाच त्यांच्या धावसंख्येवर सनरायर्स हैराबादने अंकूश ठेवला.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणफेक जिंकत कोलकाताला प्रथम फलंदाजी दिली. राणाने शुभमन गिलच्या साथीत संघाचा अर्धशतकी सलामी दिली. गिल स्थिरावला असे वाटत असतानाच रशिद खानच्या गुगलीवर त्रिफळाबाद झाला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठीनेही अर्धशतकी खेळी करताना राणाला सुरेख साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 93 धावांची बहुमोल भागीदारी केली व संघाला मोठ्या धावसंख्येचा पाया घालून दिला. दरम्यान या दोघांनीही आपापली अर्धशतके पूर्ण केली.
त्रिपाठी अत्यंत अनावश्यक फटका खेळून बाद झाला. त्याने 53 धावांच्या खेळीत 29 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार व 2 षटकार फटकावले. त्यानंतर आलेला अष्टपैलू आंद्रे रसेलही खेळपट्टीवर टिकू शकला नाही. एका बाजूने राणाने संघाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने हैदराबादच्या जवळपास प्रत्येक गोलंदाजावर वर्चस्व राखले. राणा या स्पर्धेतील पहिले शतक साकार करेल असे वाटत असतानाच 80 धावावंर बाद झाला. त्याने आपल्या खेळीत 56 चेंडूंचा सामना करताना 9 चौकार व 4 षटकार अशी आतषबाजी केली. तो बाद झाल्यावर कोलकाताचा कर्णधार इयान मॉर्गननेही निराशा केली. तो केवळ 2 धावा काढून बाद झाला. राणासह महंमद नबीने मॉर्गनलाही तंबूचा रस्ता दाखवला.
त्यानंतर माजी कर्णधार दीनेश कार्तिक व शकिब अल हसन यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकांत कार्तिकने आक्रमक फलंदाजी करताना केवळ 9 चेंडूत 22 धावा केल्या. त्यात त्याने 1 षटकार 2 चौकार फटकावले. अखेरच्या चेंडूवर उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात हसन 3 धावा काढून बाद झाला व कोलकाताचा डाव 6 बाद 187 असा रोखला गेला. हैदराबादकडून रशिद खान व महंमद नबी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर टी. नटराजन व भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता – 20 षटकांत 6 बाद 187 धावा. (नितिश राणा 80, राहुल त्रिपाठी 53, दीनेश कार्तिक नाबाद 22, शुभमन गिल 15, रशिद खान 2-24, महंमद नबी 2-32, टी. नटराजन 1-37, भुवनेश्वर कुमार 1-45). सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 5 बाद 177 धावा. (मनीष पांडे नाबाद 61, जॉनी बेअरस्टो 55, अब्दुल समद नाबाद 19, प्रसिध कृष्णा 2-35, पॅट कमिन्स 1-30, आंद्रे रसेल 1-32, शकिब अल हसन 1-34).