चेन्नई -आयपीएल स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर बेंगळुरू व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होत असलेला सामना स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. त्यातही बेंगळुरूची बाजू काहीशी वरचढ वाटत आहे.
यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघांनी संमिश्र यश मिळालेले असले तरीही कोलकाताच्या कामगिरीबाबत अद्यापही अनेक प्रश्न आहेत. अत्यंत कमी धावसंख्या उभारूनही मुंबई इंडियन्सने कोलकाताचा निसटता पराभव केला होता. हाच पराभव त्यांच्या जिव्हारी लागला असून आता त्याचा वचपा बेंगळुरूविरुद्ध काढण्यासाठी त्यांना आपल्या खेळात प्रचंड बदल करावे लागणार आहेत.
केवळ खेळातील बदलच नव्हे तर संघातील प्रत्येकाला जबाबदारी ओळखून खेळ करावा लागणार आहे. मुंबईविरुद्ध विजयाची निश्चिती वाटत असतानाच त्यांच्या फलंदाजांनी नांगी टाकल्याने अवघ्या 10 धावांनी सामना गमावला.
नितीश राणा, शुभमन गिल यांचा अपवाद वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला सरस कामगिरी करता आलेली नाही. त्यातही अनुभवी दिनेश कार्तिक, आंद्रे रसेल, राहुल त्रिपाठी यांनीही साफ निराशा केली. अष्टपैलू शकिब अल हसन याला अद्याप सूर गवसलेला नाही. गोलंदाजीत सुनील नरीन अपयशी ठरत असताना केवळ पॅट कमिन्सनेच चमक दाखवली आहे.
कोहलीच्या नेतृत्वाखालील बेंगळुरू संघाचे मात्र, नशीब बलवत्तर आहे. त्यांनी पहिल्या सामन्यात मुंबईचा पराभव केला व स्पर्धेत विजयी सलामी दिली. तर दुसऱ्या सामन्यात त्यांनी सनरायझर्स हैदराबादला अत्यंत अविश्वसनीय पद्धतीने पराभूत केले. बेंगळुरूचे सर्व खेळाडू भरात आहेत. कर्णधार कोहलीच्या बॅटमधूनही धावा होत आहेत.
मात्र, त्याला मोठी खेळी करण्यात यश आलेले नाही. त्यातच एबी डिविलियर्सलाही कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. देवदत्त पडीक्कल व शाहबाज अहमद यांना येत असलेले अपयश त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे.
यंदाच्या स्पर्धेत कोहलीचे निर्णयदेखील यशस्वी ठरत आहेत. त्यांच्या संघात हर्षल पटेल, शाहबाज अहमद व काएल जेमिसन व महंमद सिराज असे होतकरू गोलंदाज आहेत.
मात्र, त्यातही अहमदने यंदा चांगलेच प्रभावित केले आहे. तसे पाहिले तर बेंगळुरू फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण व नेतृत्व यात सरस वाटतो. त्यामुळे हैदराबादला हा सामना जिंकायचा असेल तर क्षमतेपेक्षाही सरस खेळ करावा लागेल.
सामन्याची वेळ
दुपारी : 3.30
ठिकाण ः एम. ए. चिदम्बरम स्टेडियम, चेन्नई
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्सवर