IPL2021 | आयपीएलचा थरार 9 एप्रिलपासून

मुंबईसह सहा शहरांमध्ये होणार सामन्यांचे आयोजन

नवी दिल्ली – इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल 2021) 14व्या मोसमाचा थरार 9 एप्रिलपासून सुरू होणार असून 30 मे रोजी अंतिम सामना खेळण्यात येणार आहे. यंदा आयपीएल 2021 चा मोसम 51 दिवस रंगणार असून सर्व सामने भारतातच होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तसेच स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा बीसीसीआयने केली.

गतवर्षी करोनाच्या पार्श्‍वभूमीवर आयपीएलचा 13 वा मोसम सप्टेंबर ते नोव्हेंबरदरम्यान दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता. परंतु आता देशात करोनाची संख्या नियंत्रणात असून लसीकरणालाही सुरुवात झाल्याने आयपीएलचा यंदाचा मोसम घरच्या मैदानावरच होईल. ही स्पर्धा सहा शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे. मुंबई, कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, चेन्नई आणि बंगळुरू येथील मैदानावर जगातील सर्वाधिक लोकप्रिय लीगचे सामने रंगतील.

दुबईमध्ये झालेल्या आयपीएलच्या 13 मोसमात 60 सामने खेळले गेले होते. शारजाह, दुबई आणि अबुधाबीमध्ये हे सामने रंगले होते. मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली होती.

दरम्यान, चेन्नईमध्ये गतमहिन्यात आयपीएल 2021साठी मिनी लिलाव पार पडला होता. तेव्हापासून वेळापत्रकाबाबत चर्चा सुरू झाली होती. आता अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे की ग्रुप स्टेजचे सर्व सामने मुंबईत आणि नॉकआऊटचे सामने अहमदाबादमध्ये होतील.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.