नवी दिल्ली -नेतृत्त्वात बदल केल्यानंतरही राजस्थान रॉयल्सविरोधात पराभूत झालेल्या सनरायजर्स हैदराबाद मंगळवारी स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे सलग दोन विजयासह लय मिळविल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सला विजयासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहे.
हैदराबाद संघाला आतापर्यंतच्या सात सामन्यांपैकी केवळ एका सामन्यात विजय मिळविता आला आहे. ते गुणतालिकेत 2 गुणांसह तळात आहे. मुंबई-हैदराबाद सामन्यात लेगस्पिनर रशिद खान आणि पॉवर हिटर कायरन पोलार्ड यांच्यात खरी लढत होणार आहे. पोलार्डसह क्विंटन डीकॉक आणि कर्णधार रोहित शर्माही फॉर्मात आहेत. याशिवाय कृणाल पंड्या, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव यांच्यातही मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता आहे.
मुंबईच्या गोलंदाजांना चेन्नईविरोधातील खराब प्रदर्शन विसरून नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्टने डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली असून हैदराबादच्या फलंदाजांना रोखण्यास ते यशस्वी ठरू शकतात.
फिरकीपटू राहुल चहर हा सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला असल्याने संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा आहे. दुसरीकडे हैदराबाद संघाला सातत्याने अपयशाला सामोरे जावे लागत आहे. आघाडीचा फलंदाज जॉनी बेयरस्टोवर मोठी जबाबदारी असणार आहे. परंतु मधळ्या फळीतील फलंदाजांना अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही.
राजस्थानविरोधातील गत सामन्यात कर्णधार डेव्हिड वॉर्नरला वगळत मनीष पांडे आणि बेयरस्टोने सलामी दिली होती. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर विलियम्सन खेळला होता. या सामन्यातही हीच क्रमवारी ठेवल्यास त्यांना मोठी धावसंख्या उभारण्याची संधी मिळेल. तसेच विजय शंकर, केदार जाधव, अब्दुल समद यांना सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागणार आहे.