मुंबई – करोनाचा धोका पुन्हा वाढू लागल्यामुळे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील मुंबईत होत असलेल्या सामन्यांबाबत संभ्रम वाढला आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेत राज्यात दररोज रुग्णसंख्या वाढत असल्याने येथे होणारे सामने अन्यत्र हलवण्याचा विचार केला जाऊ शकतो. अर्थात याबाबत अद्याप बीसीसीआयने कोणतेही वक्तव्य केले नसले तरीही येत्या दोन दिवसांत याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे संकेतही मिळाले आहेत.
आम्हाला आयपीएलच्या सामन्यांची चिंता आहेच पण खेळाडूंच्या सुरक्षेबाबत जास्त दक्षता घ्यावी लागणार आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा निश्चितच यशस्वी होईल. आता राज्यातील करोनाची परिस्थिती आम्हीही पाहात आहोत. मात्र, येथे होणारे सामने अन्यत्र हलवावेत का, याचा निर्णय अद्याप झालेला नाही. स्पर्धा महत्त्वाची आहेच; पण त्याहीपेक्षा खेळाडूंच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य राहील, असे बीसीसीआयने म्हटले आहे.
पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले गेले तर त्याचाही सामना करण्याची बीसीसीआयची तयारी आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या आठही संघांचे सराव सत्र सुरू आहे. मुंबईत सराव करणाऱ्या संघांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईत सर्वप्रथम चेन्नई सुपर किंग्जने सरावाला प्रारंभ केला.
आम्ही बीसीसीआय व आरोग्य मंत्रालयाच्या संपर्कात आहोत. राज्यात दररोज प्रचंड रुग्णवाढ होत आहे मात्र, तरीही आम्ही मुंबईतील सामन्यांबाबत आशावादी आहोत. पुढील 48 तासांत परिस्थिती कशी असेल ते पाहूनच पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुंबई क्रिकेट संघटनेने सांगितले आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेला येत्या 9 एप्रिलपासून प्रारंभ होणार असून मुंबईत पहिला सामना 10 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जाणार आहे.
आठ ग्राउंड्समन करोनाबाधित
आयपीएलच्या यंदाच्या मोसमाला येत्या 9 एप्रिलपासून प्रारंभ होत असला तरीही आता नवे संकट उभे राहिले आहे. मुंबईतील प्रसिद्ध वानखेडे स्टेडियमच्या आठ ग्राउंड्समनला करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मुंबई क्रिकेट संघटना व बीसीसीआयच्या गोटात चिंता वाढली आहे. या मैदानावर यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे 10 सामने होणार आहेत. 10 ते 25 एप्रिलदरम्यान हे सामने आयोजित करण्यात येत आहेत. वानखेडे स्टेडियममधील सर्व 19 ग्राउंडस्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी गेल्या आठवड्यात झाली. 26 मार्च रोजी यातील 3 लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी उर्वरित 5 ग्राउंड्समनही करोनाबाधित असल्याचे समोर आले.
अक्सर पटेलही करोनाबाधित
आयपीएल स्पर्धा सुरू होण्यास केवळ आठ दिवसांचा अवधी राहिलेला असताना दिल्ली कॅपिटल्स संघातही करोनाने एन्ट्री घेतली आहे. स्टार फिरकी गोलंदाज अक्सर पटेल याला करोनाची बाधा झाल्याचे शनिवारी समोर आले आहे. करोनाची बाधा झालेला पटेल हा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या नितिश राणा याचाही करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र, त्याचा दुसऱ्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.