रांची – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेतील अपयशामुळे व्यथीत झालेला चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मायदेशी परतल्यावर लगेचच तंदुरुस्ती टीकवण्यासाठी जिममध्ये दाखल झाला आहे. ही तयारी पुढील वर्षीच्या आयपीएलसाठी असल्याचे बोलले जात आहे.
धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला या स्पर्धेत यंदा अत्यंत निराशाजनक कामगिरीमुळे प्ले-ऑफमध्येही स्थान मिळवता आले नाही. आता 2021 सालची आयपीएल स्पर्धा अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेसाठीही धोनीच कर्णधार राहणार असल्याचे चेन्नई संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केल्यानंतर आता सर्व लक्ष धोनीकडे लागले होते.
त्यानेही मायदेशात परतल्यानंतर आराम करण्यापेक्षा जिममध्ये दाखल होत पुढील स्पर्धेच्या तयारीला लागणे पसंत केले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो व व्हिडिओमध्ये धोनी जिममध्ये मेहनत घेत असल्याचे दिसून आले.
@msdhoni back in gym,this time with his brother 💪🏻🔥#MSDhoni #Dhoni #workout pic.twitter.com/r3Vu1p4qIv
— Dhoni raina (@Dhoniraina73) November 6, 2020
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत धोनीच्या चेन्नई संघाला 14 सामन्यांत 8 पराभव पत्करावे लागल्याने त्यांचे आव्हान संपुष्टात आले. आता पुढील वर्षी तरी चेन्नईचा संघ गतवैभव मिळवणार का, असा प्रश्न चाहते विचारत होते. आज धोनीचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्याने धोनीच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.