दुबई – जोफ्रा आर्चर व जयदेव उनाडकट यांनी मोक्याच्या क्षणी घेललेल्या बळींच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 7 बाद 161 धावांवर रोखले. सलामीवीर शिखर धवन व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी जबाबदारीने खेळी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
कर्णधार अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याकडून असलेली अपेक्षा फ्लॉप ठरली. शाॅ शून्यावर बाद झाला. त्याचवेळी या सामन्याद्वारे दुसरी संधी मिळालेला मुंबईकर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. रहाणे 2 धावा काढून बाद झाला.
त्यानंतर शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरला. संघाची धावसंख्या 95 असताना धवन 57(33) बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 132 वर पोहचली असताना अय्यर 53(43) बाद झाला. त्यानंतर मार्कस स्टोईनिस 18(19), एलेक्स कैरी 14(13) आणि अक्षर पटेल 7(4) यांनी संघाची धावसंख्या 20 षटकांत 161 पर्यंत नेली व राजस्थानसमोर 162 धावांचे आव्हान उभे केले.
राजस्थानकडून गोलंदाजीत जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 तर जयदेव उनादकटने 2 गडी बाद केले. कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 7 बाद 161 धावा. (शिखर धवन 57, श्रेयस अय्यर 53, जोफ्रा आर्चर 3-19, जयदेव उनाडकट 2-32).