दुबई – भारतीय संघातील स्टार खेळाडूंचा भरणा असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाबला कसे रोखायचे हाच मुख्य प्रश्न दिल्ली कॅपिटल्स संघासमोर राहणार आहे. शनिवारपासून सुरू झालेल्या आयपीएल स्पर्धेत आज दुसरा सामना याच दोन संघात होत आहे.
शिखऱ धवन, अजिंक्य रहाणे यांच्यासारखे वरिष्ठ खेळाडू असूनही संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे सोपविण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. धवन व रहाणे यांच्या जोडीला पृथ्वी शॉ, शिमरॉन हेटमायर व अलेक्स कॅरी यांच्यासारखे अव्वल फलंदाज दिल्लीकडे आहेत. त्याचबरोबर ईशांत शर्मा, अमित मिश्रा, रवीचंद्रन अश्विन व कागीसो रबाडा अशी तगडी गोलंदाजीही त्यांच्या ताफ्यात आहे.
मात्र, त्याचवेळी पंजाबच्या तगड्या फलंदाजीला रोखण्यासाठी त्यांना या गोलंदाजांच्याच कामगिरीवर अवलंबून राहावे लागणार आहे. माजी महान गोलंदाज अनिल कुंबळे व ऑस्ट्रेलियाचा बलाढ्य खेळाडू माजी कर्णधार रिकी पॉंन्टिंग हे संघाचे प्रशिक्षक असल्याने दिल्ली संघाकडून यंदा खूप मोठ्या अपेक्षा आहेत.
आजचा सामना : दिल्ली विरूध्द पंजाब
सामन्याची वेळ :- सायंकाळी : 7ः30 (भारतीय प्रमाण वेळेनुसार)
ठिकाण : दुबई
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्टसवर
कर्णधार लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, भरात असलेला ग्लेन मॅक्सवेल, ऍण्ड्य्रू टाय, डेव्हिड मिलर यांच्यामुळे त्यांची फलंदाजी भक्कम आहे. त्यामुळे दिल्लीच्या गोलंदाजांना त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी प्रत्येकासाठी वेगळी नीती बनवावी लागणार आहे.
मॅक्सवेल, राहुल, मिलर यांच्या आक्रमकतेवर नियंत्रण आणण्यासाठी इशांत व रबाडा यांना डावाच्या सुरुवातीलाच बळी मिळवावे लागणार आहेत. नुकत्याच इंग्लंडविरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला विजेतेपद मिळवून देण्यात मॅक्सवेलचा मोठा वाटा होता. त्याने निर्णायक लढतीत चौकार व षटकारांची आतषबाजी करत शतकी खेळी साकारली होती. त्यामुळे मिडास टचमध्ये असलेल्या मॅक्सवेलकडून दिल्लीला गारद होण्याचा धोका जास्त आहे.
नाणेफेक जिंकणारा संघ फलंदाजी घेणार
आबूधाबीप्रमाणे दुबईतील वातावरण फारसे उष्ण नसल्याने दुसऱ्या डावात गोलंदाजी करताना गोलंदाजांना चेंडू व्यवस्थित ग्रीप करता येणार आहे. खेळपट्टीचा इतिहासही पहिल्या डावात फलंदाजी करत असलेल्या संघांच्या बाजूने असल्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी दोन्ही संघांचे कर्णधार आतूर राहणार आहेत.