शारजा – कर्णधार रोहित शर्मा, कॅरन पोलार्ड, हार्दिक पंड्या व इशान किशन या पॉवर हिटर्सला कसे रोखायचे हेच आव्हान सनरायझर्स हैदराबादसमोर आजच्या सामन्यात राहणार आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या हैदराबाद संघाकडे सलामीच्या जोडीचा तसेच मधल्या फळीत सरस फलंदाज नसल्याने खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या स्पर्धेच्या इतिहासात वॉर्नरनेच संघाचा मुख्य भार उचलला आहे. त्याला साथ देताना जॉनी बेअरस्टो याने सरस कामगिरी केली आहे. मात्र, मनीष पांडे, प्रियम गर्ग, अभिषेक शर्मा व विजय शंकर यांना आतापर्यंत झालेल्या सामन्यात अपयशाचाच सामना करावा लागले आहे. त्यामुळे त्यांना मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करू शकेल अशा फलंदाजाची उणिव जाणवत आहे.
गोलंदाजीतही भुवनेश्वर कुमार व रशिद खान यांच्यावरच प्रामुख्याने अवलंबून राहावे लागत आहे. मिशेल मार्श जायबंदी झाल्याने त्याच्या जागी आता कोणाला खेळवायचे हाच प्रश्न वॉर्नरसमोर आहे. टी. नटराजनने आपल्या यॉर्करने सर्वच संघांना चकित केले असले तरीही त्याच्याकडे सातत्याचा आभाव आहे. संदीप शर्मा देखील युवा व होतकरू गोलंदाज असला तरीही त्याने यंदा फारशी चमक दाखवलेली नाही. त्यामुळे मुंबईच्या पॉवर हिटर्सला रोखण्यासाठी त्यांना प्रयत्नांची शिकस्त करावी लागणार आहे.
रोहित शर्मा भरात आल्याने हैदराबादच्या डोकेदुखीत निश्चितच वाढ झालेली आहे. पोलार्ड व पंड्या यांचा आक्रमकपणा तर सर्वश्रुत आहे. आता त्यांच्या जोडीला युवा फलंदाज इशान किशनही असल्याने त्यांची फलंदाजी सर्वात भक्कम बनली आहे. जेम्स पॅटिंन्सन, राहुल चहर, पंड्या, पोलार्ड यांच्या गोलंदाजीनेही त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे. हैदराबादचे पहिले तीन फलंदाज बाद केले तर संपूर्ण सामन्यात मुंबईचेच वर्चस्व राहणार असेच चित्र दिसत आहे.
बुमराह निर्णायक ठरेल..
शारजाच्या मैदानावर तसे पाहिले गेले तर वेगवान गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाही. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचेच वर्चस्व राहते. मात्र, मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह जगातील कोणत्याही खेळपट्टीवर आपल्या भन्नाट यॉर्करने प्रतिस्पर्धी संघाची दांडी गुल करू शकतो. या मैदानावर संध्याकाळी पडत असलेल्या दवामुळे चेंडू ग्रीप करणे कठीण जाते असे म्हटले जाते; मात्र बुमराहला त्याचा त्रास कधीच जाणवला नाही हे देखील स्पष्ट झाले आहे. या स्थितीत त्याचे स्विंग व यॉर्कर हैदराबादला महागात पडू शकतात.