आबुधाबी – कॉन्टन डिकॉक व सूर्यकुमार यादव यांची अर्धशतकी खेळी तसेच इशान किशन, कॅरन पोलार्ड व कृणाल पंड्या यांच्या उपयुक्त फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 5 गडी राखून पराभव केला. विजयासाठी 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबईने 5 गडी गमावून 166 धावा करत विजय मिळवला. कॉन्टन डिकॉक सामन्याचा मानकरी ठरला.
त्तपूर्वी, सलामीवीर शिखर धवनची नाबाद 69 धावांची खेळी तसेच कर्णधार श्रेयस अय्यर व अलेक्स कॅरीची उपयुक्त फलंदाजी यांच्या जोरावर दिल्लीने मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात 4 बाद 162 धावांपर्यंत मजल मारली.
नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी दिल्लीने संघात दोन बदल केले. शेमरन हेटमायरच्या जागी अलेक्स कॅरीला तर ऋषभ पंतच्या जागी अजिंक्य रहाणेला संघात स्थान दिले. भरात असलेला पृथ्वी शॉ या सामन्यात अपयशी ठरला. त्याला केवळ 4 धावांवर ट्रेन्ट बोल्टने बाद केले.
रहाणेला 15 धावांवर कृणाल पंड्याने पायचीत केले. त्यावेळी दिल्लीची अवस्था 2 बाद 24 अशी बिकट बनली होती. त्यानंतर मात्र, शिखर धवन व कर्णधार श्रेयस अय्यर यांची जोडी जमली. त्यांनी आक्रमक फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केली व संघाचे शतक फलकावर लावले.
स्थिरावलेला अय्यर 33 चेंडूत 5 चौकार फटकावून 42 धावांवर बाद झाला. त्यानंतर भरात असलेल्या मार्कस स्टोनिसने धवनला साथ दिली. मात्र, तो धावबाद होऊन परतला. दरम्यान, धवनने आपले अर्धशतक पूर्ण केले. अलेक्स कॅरीने धवनला साथ देत संघाला दीडशकी धावांच्या पुढे मजल मारून दिली.
धवनने नाबाद 69 धावांची खेळी करताना 52 चेंडूंचा सामना केला. त्याने 6 चौकार व 1 षटकार फटकावला. कॅरीने नाबाद 14 धावा केल्या. मुंबईकडून कृणाल पंड्याने 2 तर ट्रेन्ट बोल्टने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 4 बाद 162 धावा. (अजिंक्य रहाणे 15, श्रेयस अय्यर 42, शिखर धवन नाबाद 69, अलेक्स कॅरी नाबाद 14, कृणाल पंड्या 2-26, ट्रेन्ट बोल्ट 1-36). मुंबई इंडियन्स – 19.4 षटकात 5 बाद 166 धावा. (कॉन्टन डिकॉक 53, सूर्यकुमार यादव 53, इशान किशन 28, कृणाल पंड्या नाबाद 12, कॅरन पोलार्ड नाबाद 11, कागिसो रबाडा 2-28).