ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूची भविष्यवाणी
मुंबई – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सचा संघच यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे विजेतेपद जिंकेल, अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचा माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ब्रॅड हॉग याने केली आहे.
रोहित सध्या भरात आहे. करोनामुळे जबरदस्तीची विश्रांती मिळाली असली तरीही खेळाडूंसाठी हा काळ लाभदायकच ठरणार आहे. कारण येत्या काळात आयपीएलसह सातत्याने स्पर्धा खेळाव्या लागणार आहेत. रोहितच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ अत्यंत समतोल आहे. त्यांची फलंदाजी खोलवर आहे. या स्पर्धेच्या इतिहासातही त्यांनीच वर्चस्व राखले आहे. त्यामुळे तेच यंदा विजेतेपद मिळवतील असा विश्वास वाटतो. अर्थात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंगनेही स्पर्धेत दबदबा निर्माण केला आहे. त्यामुळे याच दोन संघात अंतिम सामना होईल असे वाटते, असेही हॉग म्हणाला.
करोनाच्या धोक्यामुळे ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली होती. आता हा धोका कमी झाला नसला तरीही स्पर्धेचे आयोजन अमिरातीत करण्यात आल्याने सर्व संघांना दिलासा मिळाला आहे.
हार्दिक पंड्या ट्रम्पकार्ड ठरेल
मुंबई संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या याच्या कामगिरीवर मुंबईचे विजेतेपद अवलंबून राहील. त्याच्याकडे अफाट गुणवत्ता आहे. आक्रमक फलंदाजी करण्याबरोबरच तो एक गुणवत्ता असलेला मध्यमगती गोलंदाजही असल्याने तोच या स्पर्धेत मुंबई संघाचे ट्रम्पकार्ड ठरेल, असेही हॉगने सांगितले.