आबूधाबी – प्रमुख फलंदाजांना आलेल्या अपयशामुळे किंग्ज इलेव्हन पंजाबला मुंबई इंडियन्सकडून 48 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी 192 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाबचा डाव 8 बाद 143 असा रोखला गेला. मुंबईकडून जसप्रित बुमराह, राहुल चहर व जेम्स पॅटिन्सन यांनी महत्त्वाच्या क्षणी पंजाबचे फलंदाज बाद केल्याने मुंबईसाठी सोपा विजय ठरला.
तत्पूर्वी, कर्णधार रोहित शर्माच्या अर्धशतकानंतर कॅरन पोलार्ड व हार्दिक पंड्या यांनी केलेल्या आक्रमक खेळीने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 4 गडी गमावून 191 अशी समाधानकारक धावसंख्या उभारली.
पंजाबने नाणेफेक जिंकत मुंबईला फलंदाजी दिली. सुरुवातीलाच पंजाबच्या गोलंदाजांनी मुंबईला धक्के दिले. सलामीवीर कॉन्टन डीकॉक संघाच्या धावांचे खातेही उघडलेले नसताना बाद झाला. त्यानंतर सूर्यकुमार यादवनेही निराशा केली. त्यानंतर रोहितला साथ देत इशान किशनने उपयुक्त खेळी करत अर्धशतकी भागीदारी केली. किशन स्थिरावल्यानंतरही उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्यानंतर रोहितने कॅरन पोलार्डसह धावांचा वेग वाढवला. 40 चेंडूतच त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले. डावाची सूत्रे आपल्या हाती घेत रोहितने आक्रमण वाढवले व वेगाने धावा घेतल्या.
अर्धशतक झाल्यानंतर रोहितने पंजाबच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.या जोडीने 14 व्या षटकांत संघाचे शतक फलकावर लावले. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याने चेंडू अनुभवी गोलंदाज महंमद शमीकडे सोपवला. त्यानेही कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवताना आक्रमक रोहितला बाद केले. रोहितने 45 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 70 धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर आलेल्या हार्दिक पंड्याने पोलार्डला सुरेख साथ देत अत्यंत वेगाने धावा केल्या. या जोडीने 5 व्या गड्यासाठी 23 चेंडूत 67 धावांची भागीदारी केली.
कृष्णप्पा गौतमच्या अखेरच्या षटकात पंड्या व पोलार्ड यांनी मिळून 4 षटकारांची आतषबाजी करत संघाला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. पोलार्ड 47 तर पंड्या 30 धावांवर नाबाद राहिले. पोलार्डने 20 चेंडूत 3 चौकार व 4 षटकार फटकावले. तर, पंड्याने 3 चौकार व 2 षटकार मारले. पंजाबकडून शेल्डन कोट्रेल, महंमद शमी व कृष्णप्पा गौतम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स – 20 षटकांत 4 बाद 191 धावा. (इशान किशन 28, रोहित शर्मा 70, कॅरन पोलार्ड नाबाद 47, हार्दिक पंड्या नाबाद 30, शेल्डन कोट्रेल 1-20). किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 8 बाद 143 धावा. (निकोलस पुरन 44, मयंक आग्रवाल 25, कृष्णाप्पा गौतम नाबाद 22, जसप्रित बुमराह 2-18, राहुल चहर 2-26).
ठळक घडामोडी
- राहुलविरुद्धची टशन रोहितने जिंकली
- राहुल व मयंक अपयशी
- या दोन संघात आधी झालेल्या सामन्यांत मुंबईचे वर्चस्व
- मुंबईने 14 तर पंजाबने 11 सामने जिंकले
- रोहितच्या 5 हजार धावा पूर्ण