आबूधाबी – शेन वॉटसन, अंबाती रायडू आणि रवींद्र जडेजा यांच्या प्रयत्नशील फलंदाजीनंतरही चेन्नई सुपरकिंग्जला कोलकाता नाईट रायडर्सकडून 10 धावांनी पराभव पत्कारावा लागला. विजयासाठी 168 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईला 5 बाद 157 धावांवर रोखत कोलकाताने विजय मिळवला. राहुल त्रिपाठी सामनावीर ठरला.
चेन्नईकडून फलंदाजीत शेन वॅाटसनने 50(40), फाफ डू प्लेसी 17(10), अंबाति रायुडू 30(27), एमएस धोनी 11(12), सॅम करन 17(11), केदार जाधव नाबाद 7(12) आणि रविंद्र जडेजाने नाबाद 21(08) धावा केल्या.
तत्पूर्वी, महाराष्ट्राचा नवोदित फलंदाज राहुल त्रिपाठीने केलेल्या अफलातून खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात सर्वबाद 167 धावा अशी मजल मारली. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चेन्नईच्या शार्दुल ठाकूर, कर्ण शर्मा या गोलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला.
भरवशाचे फलंदाज शुभमन गील, नितीश राणा, सुनील नरेन, इयान मॉर्गन व सर्वात धोकादायक आंद्रे रसेल यांना स्वस्तात बाद करत चेन्नईने कोलकाताला अडचणीत आणले होते. त्यावेळी एकहाती सूत्रे सांभाळताना त्रिपाठीने चेन्नईच्या गोलंदाजांवरच दडपण आणले. त्याने चौफेर फटकेबाजी करत संघाचा डाव एकहाती सावरला. त्याने 51 चेंडूत 8 चौकार व 3 षटकारांची आतषबाजी करत 81 धावांची खेळी केली. मात्र, त्याला अन्य फलंदाजांनी योग्य साथ न दिल्याने कोलकाताला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आले नाही.
गील, नरेन, कार्तिक व पॅट कमिन्स यांनी थोडीफार चुणूक दाखवल्यामुळे त्रिपाठी बाद झाल्यानंतरही कोलकाताने सर्वबाद 167 धावांपर्यंत मजल मारली. कमिन्सने 9 चेंडूत 1 चौकार व 1 षटकार फटकावला व नाबाद 17 धावांची खेळी केल्याने कोलकाताला दीडशतकी धावांपर्यंत जाता आले. या स्पर्धेत त्रिपाठीने प्रथमच मिळालेल्या संधीचे सोने केले. मात्र, त्याला समोरून एकाही फलंदाजाने साथ न दिल्याने चेन्नई सुपर किंग्जने त्यांचा डाव रोखण्यात यश मिळवले.
संक्षिप्त धावफलक
कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत सर्वबाद 167 धावा. (राहुल त्रिपाठी 81, पॅट कमिन्स नाबाद 17, कर्ण शर्मा 2-25, सॅम कुरेन 2-26, शार्दुल ठाकूर 2-28, ड्वेन ब्राव्हो 3-37). चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 157 धावा. (शेन वॉटसन 50, अंबाती रायडू 30, रविंद्र जडेजा नाबाद 21, आंद्रे रसेल 1-18, कमलेश नागरकोटी 1-21).
स्पर्धेतील ठळक घडामोडी
- मुंबईचा सलग तिसरा विजय
- जसप्रित बुमराहचे यंदाच्या स्पर्धेत विक्रमी 4 बळी
- मुंबई संघ स्पर्धेत अव्वल स्थानी
- 5 सामन्यांत 3 विजयासह 8 गुणांची नोंद
- राजस्थानचा सलग तिसरा पराभव
- षटकांची गती न राखल्याने स्मिथला 12 लाखांचा दंड
- यापूर्वी विराट कोहली व श्रेयस अय्यरलाही दंड
- पोलार्डने घेतलेला बटलरचा झेल ठरला आतापर्यंतचा सर्वोत्तम
- राजस्थानच्या कार्तिक त्यागीचा अनोखा विक्रम
- पदार्पणाचा सामना, पहिल्याच षटकात घेतला बळी