आबूधाबी – सनरायझर्स हैदराबादने दिल्ली कॅपिटल्सचा 15 धावांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. फिरकी गोलंदाज रशिद खानने केलेल्या भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीच्या प्रमुख फलंदाजांना अपयश आले. त्याला योग्य साथ देताना भुवनेश्वर कुमारनेही अचूक गोलंदाजी केली. विजयासाठी 163 धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचा डाव 20 षटकांत 7 बाद 147 असा रोखत हैदराबादने विजय मिळविला.
तत्पूर्वी, आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबादच्या धावसंख्येला दिल्ली कॅपिटल्सचा फिरकी गोलंदाज अमित मिश्रा याने ब्रेक लावला. एकवेळ मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी होतील असे चित्र निर्माण झाले होते. अखेरच्या षटकांत दिल्लीच्या गोलंदाजांनी केलेल्या अचूक गोलंदाजीमुळे हैदराबादला 4 गडी गमावून 162 धावाच करता आल्या.
दिल्लीने नाणेफेक जिंकत हैदराबादला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो यांनी आक्रमक सुरुवात केली. या दोघांनी 77 धावांची सलामी दिली. त्यावेळी वॉर्नर जास्त आक्रमक होता. तो धोकादायक ठरणार असे वाटत असतानाच गोलंदाजीला आलेल्या मिश्राने त्याला बाद करत ही जोडी फोडली व तिथेच हैदराबादच्या धावांना ब्रेक लागला. वॉर्नरला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. त्याने 3 चौकार व 2 षटकार फटकावत 45 धावा केल्या.
यंदाच्या स्पर्धेत भरात असलेला मनीष पांडे देखील मिश्राचाच बळी ठरला. एका बाजूने बेअरस्टो याने खेळपट्टीवर ठाण मांडले. त्याने कमीत कमी धोका पत्करुन फलंदाजी केली. पांडे बाद झाल्यावर केन विल्यमसनने बेअरस्टोला योग्य साथ दिली. या दोघांनी जोखीम पत्करून धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, बेअरस्टोने 44 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. मात्र, त्यानंतर धावांचा वेग वाढवण्याच्या नादात तो बाद झाला. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर अब्दुल समद याने विल्यमसनला साथ दिली. मात्र, संघाचे दीडशतक फलकावर लावण्यासाठी त्यांना 19 व्या षटकापर्यंत वाट पाहावी लागली. विल्यमसनही उंचावरून फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला. अखेरच्या काही चेंडूत समदने केलेल्या फलंदाजीमुळे संघाला समाधानकारक धावसंख्या उभारता आली. दिल्लीकडून अमित मिश्रा व कागिसो रबाडा यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
- ठळक घडामोडी :
- टॉप ऑर्डरवरील दिल्लीला गुणतालिकेत स्थान कायम ठेवण्याची संधी
- हैदराबादची मधली फळी कमकुवत
- वृद्धिमान साहाच्या समावेशानंतरही हैदराबादला नुकसानच
- कसोटी प्रमाणे संथ फलंदाजी केल्याने टीका
- कर्णधार डेव्हिड वॉर्नर व जॉनी बेअरस्टो नंतर जबाबदार फलंदाजच नाही
- बेअरस्टोचे अर्धशतक
- मिश्रा व रबाडाच्या गोलंदाजीमुळे हैदराबादला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश
- अखेरच्या पाच षटकांत केवळ 45 धावा
संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद – 20 षटकांत 4 बाद 162 धावा. (डेव्हिड वॉर्नर 45, जॉनी बेअरस्टो 53, केन विल्यमसन 41, अमित मिश्रा 2-35, कागिसो रबाडा 2-21). दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 7 बाद 147 धावा. (शिखर धवन 34, ऋषभ पंत 28, रशिद खान 3-14, भुवनेश्वर कुमार 2-25).