शारजा – सनरायझर्स हैदराबादने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूचा 5 गडी राखून पराभव केला व पुन्हा एकदा स्पर्धेतील तळाच्या संघाने धक्कादायक निकाल नोंदवला. या पराभवामुळे बेंगळुरूच्या प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्याच्या आशांना धक्का लागला.
विजयासाठी 121 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादने वृद्धिमान साहा, मनीष पांडे व जेसन होल्डर यांच्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर सामना जिंकला.
तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहली, एबी डीविलियर्ससह प्रमुख फलंदाजांनी अत्यंत आत्मघातकी फलंदाजी केल्याने रॉयल चॅलेंजर बेंगळुरूला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध 7 गडी गमावून 120 धावांपर्यंतच मजल मारता आली.
प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी बेंगळुरूला हा सामना जिंकणे महत्त्वाचे असतानाही कोहलीसह सर्व प्रमुख फलंदाजांनी निऱाशा केली. हैदराबादच्या गोलंदाजांनी विशेषतः संदीप शर्माने बिग फिश कोहली व डीविलियर्सला बाद करत संघाच्या मार्गातील मोठा अडसर दूर केला. कोहली केवळ 7 तर, डीविलियर्स 24 धावांवर बाद झाला.
यंदाच्या स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत असलेला सलामीवीर देवदत्त पडीक्कलनेही निराशा केली. जोश फिलिप्सने काही काळ किल्ला लढवला. मात्र, तो देखील फिरकी गोलंदाज रशिद खानच्या सुरेख रॉंगवनवर बाद झाला. त्याने 32 धावांची खेळी केली. त्यावेळी बेंगळुरूचे 4 फलंदाज संघाच्या 76 धावा असताना तंबूत परतले होते.
त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर व गुरकीरतसिंग मान या जोडीने चांगला प्रतिकार केला. या जोडीने 17 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. सुंदरने 21 धावांची खेळी केली मात्र, तो देखील बाद झाला. त्यावेळी ख्रिस मॉरिस व इसुरू उदाना यांनीही निराशा केली. या वेळी बेंगळुरूची अवस्था 7 बाद 114 अशी दयनीय बनली होती. एका बाजूने गुरकीरत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
हैदराबादच्या गोलंदाजांनी अखेरच्या षटकात अत्यंत अचूक गोलंदाजी करत बेंगळुरूचा डाव 20 षटकांत 7 बाद 120 धावांवर रोखला. हैदराबादकडून संदीप शर्मा व जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. बेंगळुरू संघाला सुरुवातीच्या सामन्यांत अपयश आले होते. मात्र, त्यांनी नंतरच्या सामन्यांत सरस कामगिरी करत पहिल्या चार संघात स्थान मिळवले व प्ले-ऑफच्या शर्यतीत स्थान मिळवले. मात्र, आता महत्वाचे सामने सुरू झाल्यावर बेंगळुरूचा खेळ पुन्हा एकदा खालावल्याचेच दिसून येत आहे.
संक्षिप्त धावफलक
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 7 बाद 120 धावा. (जोश फिलीप्स 32, एबी डीविलियर्स 24, वॉशिंग्टन सुंदर 21, गुरकीरतसिंग मान नाबाद 15, महंमद सिराज नाबाद 2, संदीप शर्मा 2-20, जेसन होल्डर 2-27). सनरायझर्स हैदराबाद – 14.1 षटकात 5 बाद 121 धावा. (वृद्धिमान साहा 39, मनीष पांडे 26, जेसन होल्डर नाबाद 26, यजुवेंद्र चहल 2-19).