दुबई – गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा 13 धावांनी पराभव केला. गोलंदाज अनरिच नोर्जे सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या राजस्थानचा डाव 8 बाद 148 धावांवर रोखत दिल्लीने विजय मिळवला. बेन स्टोक्स, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जोस बटलर व राहुल तेवतिया यांनी विजयासाठी केलेले शर्थीचे प्रयत्न निष्फळ ठरले. दिल्लीच्या अनरिच नोर्जे, तुषार देशपांडे, कागिसो रबाडा, अक्सर पटेल व रविचंद्रन अश्विन यांनी अचूक गोलंदाजी करत संघाचा विजय साकार केला. 20 व्या षटकातील पहिल्या चेंडूवर तेवतियाने षटकार मारण्याचा केलेला प्रयत्न दिल्लीच्या अजिंक्य रहाणेने व्यर्थ ठरवला. हाच क्षण सामन्याला कलाटणी देणारा ठरला.
A brilliant win here for the @DelhiCapitals as they beat #RR by 13 runs in Match 30 of #Dream11IPL.#DCvRR pic.twitter.com/jgF35MrnZR
— IndianPremierLeague (@IPL) October 14, 2020
तत्पूर्वी, जोफ्रा आर्चर व जयदेव उनाडकट यांनी मोक्याच्या क्षणी घेललेल्या बळींच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सला 7 बाद 161 धावांवर रोखले. सलामीवीर शिखर धवन व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी जबाबदारीने खेळी केल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
कर्णधार अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी सलामीवीर पृथ्वी शॉ याच्याकडून असलेली अपेक्षा फ्लॉप ठरली. त्याचवेळी या सामन्याद्वारे दुसरी संधी मिळालेला मुंबईकर अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. राजस्थानचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने या दोन्ही फलंदाजांना तंबूत धाडले. त्यावेळी दिल्लीचा डाव 2 बाद 10 असा अडचणीत आला होता. त्यातून दुसरा सलामीवीर धवन व कर्णधार अय्यर ही भरात असलेली जोडी एकत्र आली. त्यांनी राजस्थानच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचे धोरण स्वीकारले.
अय्यरपेक्षा धवन जास्त आक्रमक होता. त्याने राजस्थानच्या गोलंदाजांवर हल्ला चढवताना त्यांची लय बिघडवण्याचे काम योग्यरीतीने केले, त्यामुळे अय्यरला फलंदाजी करणे सोपे ठरले. धवनने आपले अर्धशतकही थाटात पूर्ण केले. मात्र, त्यानंतर तो लगेचच बाद झाला. त्याने 33 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 57 धावांची खेळी केली.
यावेळी अय्यरला साथ देण्यासाठी या स्पर्धेत सातत्याने धावा करणारा मार्कस स्टोनिस दाखल झाला. या जोडीने 13 व्या षटकात संघाचे शतक फलकावर लावले. अर्धशतकानंतर अय्यरही आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याने 43 चेंडूत 3 चौकार व 2 षटकारांच्या सहाय्याने 53 धावांची खेळी केली. यावेळी अलेक्स केरीने स्टोनिसला साथ दिली. या जोडीने 19 व्या षटकांत संघाचे दीडशतक फलकावर लावले. त्यांनी आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.
मात्र, राजस्थानच्या गोलंदाजांनी त्यांना तशी संधी दिली नाही. स्टोनिसही दडपणाखाली बाद झाला. त्यालाही आर्चरनेच 18 धावांवर बाद केले. केरीही जयदेव उनाडकटच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करताना 14 धावांवर बाद झाला. त्या पाठोपाठ अक्सर पटेलही डावातील अखेरच्या चेंडूवर 7 धावा काढून बाद झाला. दिल्लीने राजस्थानसमोर विजयासाठी 162 धावा करण्याचे आव्हान ठेवले आहे.
संक्षिप्त धावफलक
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 7 बाद 161 धावा. (शिखर धवन 57, श्रेयस अय्यर 53, जोफ्रा आर्चर 3-19, जयदेव उनाडकट 2-32). राजस्थान रॉयल्स – 20 षटकांत 8 बाद 148 धावा. (बेन स्टोक्स 41, रॉबिन उथप्पा 32, संजू सॅमसन 25, जोस बटलर 22, राहुल तेवतिया नाबाद 14, तुषार देशपांडे 2-37, अनरिच नोर्जे 2-33, कागिसो रबाडा 1-28).