दुबई – आयपीएल स्पर्धेबाबत खोचक वक्तव्य केल्यामुळे हरभजनसिंगला तर यंदाच्या स्पर्धेतून अचानक माघार घेत मायदेशी परतलेल्या सुरेश रैना याला चेन्नई सुपर किंग्ज झटका देण्याच्या तयारीत आहे. त्यांच्याशी असलेले करारही संपुष्टात आणले जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत तर हे दोघेही खेळाडू चेन्नई संघात दिसत नसले तरीही पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएल स्पर्धेत तरी ते खेळतील का? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पुढील वर्षी होत असलेल्या आयपीएलचा लिलाव रद्द झाल्यामुळे सर्व संघांना अन्य खेळाडूंसाठी बोली लावता येणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.
हरभजनसिंगने वयाची चाळीशी गाठली असल्याने पुढील स्पर्धेत त्याला कोणताही संघ आपल्याकडे घेण्याची शक्यता दिसत नाही. रैनाबाबत मात्र, चेन्नईने त्याला मुक्त केले तर अन्य संघ त्याला आपल्या संघात घेऊ शकतात. यंदाच्या स्पर्धेपासून खेळाडू देवाण-घेवाण करता येत असल्याने रैना पुढील आयपीएल स्पर्धेत अन्य संघाकडून खेळू शकतो. तसेच त्याची या स्पर्धेच्या इतिहासातील कामगिरी व त्याची तंदुरुस्ती पाहता त्याच्यासाठी अन्य संघ इच्छुक असतील.
यंदाच्या स्पर्धेत चेन्नई संघाला संमिश्र यश मिळत आहे. तरीही ते रैना व हरभजनसिंगला आगामी काळासाठी मुक्त करतील असे संकेत मिळाले आहेत. या दोन्ही खेळाडूंची नावे चेन्नई संघाच्या संकेस्थळावरूनही हटवण्यात आल्याने या वृत्ताला एकप्रकारे पुष्टीच मिळत आहे. रैनाचा 11 कोटींचा तर हरभजनचा 2 कोटींचा चेन्नई संघाशी करार झाला आहे. मात्र, आता या दोन्ही खेळाडूंनी यंदाच्या स्पर्धेतून माघार घेतल्याने त्यांना ही रक्कम मिळणार नसल्याने चेन्नईला आर्थिक लाभ होणार आहे.
करोनाच्या धोक्यामुळे रैना अमिरातीवरून मायदेशी परतला होता. त्याच्या काकांच्या घरावर दरोडा पडला होता व त्यात त्याच्या काकांचा मृत्यूही झाला होता. त्यामुळे रैनाबाबत चेन्नई संघाकडून सध्यातरी कोणतीही टीकात्मक प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र, हरभजनसिंगने आयपीएलमधील काही सामन्यांत काहीतरी गैर घडले आहे, अशी प्रतिक्रिया दिल्याने त्याच्याशी असलेला करारही चेन्नईकडून संपुष्टात आणला जाणार असल्याचे समजत आहे.
रैना मायदेशी परतल्यावर चेन्नई संघाचे सहमालक व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी टीका केली होती. नंतर त्यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे मत मांडले असले तरीही आता येत्या काळात रैना व हरभजन यांच्याशी चेन्नई संघाचे असलेले नाते संपणार असल्याचेच हे द्योतक आहे.