आबूधाबी – ऋतुराज गायकवाडची नाबाद अर्धशतकी खेळी आणि फाफ डुप्लेसी व अंबाती रायडू यांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 9 गडी राखून पराभव केला. विजय मिळवला असला तरीही चेन्नईचे यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील आव्हान तर यापूर्वीच संपले होते. मात्र, त्यांनी केलेल्या पराभावमुळे आता पंजाबचेही स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
पंजाबच्या धावसंख्येचा पाठलाग करताना चेन्नईच्या गायकवाड व डुप्लेसी या सलामीवीरांनी दमदार फलंदाजी करताना 82 धावांची सलामी दिली. डुप्लेसी आक्रमक फलंदाजी करत असतानाच ख्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्याला अर्धशतक पूर्ण करण्यात अपयश आले. त्याने 34 चेंडूत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या.
तो बाद झाल्यावर मात्र, अंबाती रायडूने ऋतुराजला उत्तम साथ देत संघाचा विजय साकार केला. दरम्यान ऋतूराजने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 49 चेंडूत 6 चौकार व 1 षटकार फटकावताना नाबाद 62 धावांची खेळी केली. त्याला सुरेख साथ देताना रायडूने 30 चेंडूत 2 चौकार फटकावत नाबाद 30 धावांची खेळी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 72 धावांची अभेद्द भागिदारी केली व संघाचा विजय साकार केला.
या स्पर्धेत अत्यंत सुमार कामगिरी केल्यावर अखेरचे काही सामने चेन्नईने जिंकले व अन्य संघांनाही संकटात टाकले. रविवारच्या या सामन्यातही चेन्नईचा संघ पंजाबलाही साथिला घेत स्पर्धेबाहेर पडला.
तत्पूर्वी, दीपक हुडाने केलेल्या दमदार खेळीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 6 बाद 152 धावांपर्यंत मजल मारली.
चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. लुंगी एन्जीडीने भेदक गोलंदाजी केली व पंजाबच्या फलंदाजांवर नियंत्रण राखले. भरात असलेला कर्णधार लोकेश राहुल, मयंक आग्रवाल या जोडीने 48 धावांची सलामी दिली. मात्र, त्यानंतर त्यांचे फलंदाज ठरावीक अंतराने बाद होत गेले व त्यांची अवस्था 6 बाद 113 अशी बिकट बनली.
त्याचवेळी दीपक हुडाने डावाची सुत्रे आपल्या हाती घेतली. त्याने 30 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 4 षटकार फटकावताना नाबाद 62 धावांची खेळी करत संघाला दीडशतकी मजल मारुन दिली. त्याने जेम्स निशाम व नंतर ख्रिस जॉर्डनला साथीला घेत 40 धावा जोडल्या. चेन्नईचा वेगवान गोलंदाज लुंगी एन्जीडीने 3 गडी बाद केले.
हा सामना पंजाबसाठी करो या मरो असा होता. त्यांना प्ले-ऑफ गटात स्थान मिळवण्यासाठी या सामन्यात केवळ विजय प्राप्त करणेच आवश्यक नव्हते तर त्यांना हा विजय मोठ्या फरकाने तसेच सरस रनरेट ठेवून मिळवणे जास्त महत्त्वाचे होते.
संक्षिप्त धावफलक – किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 6 बाद 152 धावा. (लोकेश राहुल 29, मयंक आग्रवाल 26, दीपक हुडा नाबाद 62, लुंगी एन्जीडी 3-39, रवींद्र जडेजा 1-17). चेन्नई सुपर किंग्ज – 18.5 षटकांत 1 बाद 154 धावा. (फाफ डुप्लेसी 48, ऋतुराज गायकवाड नाबाद 62, अंबाती रायडू नाबाद 30, ख्रिस जॉर्डन 1-31).