दुबई – यजुर्वेद्र चहल आणि नवदीप सैनी यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाचा 10 धावांनी पराभव करत आयपीएल स्पर्धेत विजयी सलामी दिली. युजवेंद्र चहल सामन्याचा मानकरी ठरला.
विजयासाठी 164 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या हैदराबादला 153 धावांवर रोखत कोहलीच्या संघाने संपूर्ण सामन्यांत वर्चस्व राखले. कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजीत केलेले बदल या सामन्यांत निर्णायक ठरले.
हैदराबादकडून जाॅनी बेयर्सटोने ४३ चेंडूत सर्वाधिक ६१ आणि मनीष पांडेने ३३ चेंडूत ३४ धावा केल्या, पण संघास विजय मिळवून देण्यास ते अपयशी ठरले. या दोघां व्यतिरिक्त अन्य फलंदाजानां साजेशी कामगिरी करता आली नाही.
बेंगळुरू संघाकडून गोलंदाजीत चहलने ४ षटकांत १८ धावा देत ३ विकेट घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. शिवम दुबे आणि नवदीप सैनी यांनी प्रत्येकी २ तर डेल स्टेनने १ विकेट घेत महत्वपूर्ण कामगिरी बजावली.
तत्पूर्वी नवोदित देवदत्त पडीक्कल व मिस्टर 360 एबी डीविलियर्स यांनी फटकावलेल्या दमदार अर्धशतकांच्या जोरावर रॉयल चॅलेंजर बेंगळुरू संघाने सनरायझर्स हैदराबादसमोर विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले.
नाणेफेक जिंकत हैदराबाद संघाने बेंगळुरू संघाला फलंदाजी दिली. त्यानंतर ऍरन फिंचसह पडीक्कल सलामीला फलंदाजीला आला. त्याने हैदराबादच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवताना पदार्पणातच धडाकेबाज अर्धशतकी खेळी केली. अर्धशतकानंतर तो बाद झाला. पाठोपाठ फिंचही परतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहली व एबी डीविलियर्स यांची जोडी जमेल असे वाटले होते. मात्र, कोहलीने निराशा केली. त्याला नवोदित एन. नटराजनने बाद केले.
डीविलियर्सनेही अर्धशतकी खेळी केली. मात्र, त्याला टी-20 क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा पल्ला गाठता आला नाही. त्याने आजच्या सामन्यात 2 षटकार मारले. त्याला आता हा टप्पा पूर्ण करण्यासाठी आणखी एका षटकाराची गरज आहे. या स्पर्धेत तो हा पल्ला पार करेल. तरीही या विक्रमाची मक्तेदारी ख्रिस गेलकडेच राहील. गेलने ही कामगिरी यापूर्वीच केली आहे.
सामन्यातील ठळक घडामोडी
-आरसीबीकडून करोना योद्ध्यांचा सन्मान
-“माय कोविड हिरो’ संदेश लिहिलेल्या जर्सीचा वापर
-बेंगळुरू संघाने बदलली स्वतःची नावे
-करोना योद्ध्यांची नावे लावली
-एबी डीविलियर्स झाला परितोष पंत
-विराट कोहली बनला सिमरनजीतसिंग
-स्पर्धेनंतर जर्सीचा लिलाव, करोनाग्रस्तांना निधी
-फिंच आठही संघांकडून खेळणारा पहिला खेळाडू
संक्षिप्त धावफलक :
रॉयल चॅलेंजर बेंगळुरू – 20 षटकांत 5 बाद 163 धावा. (देवदत्त पडीक्कल 56,
एबी डीविलियर्स 51, ऍरन फिंच 29, विजय शंकर 1-14, एन. नटराजन 1-34).
सनरायझर्स हैदराबाद – 19.4 षटकांत सर्वबाद 153 धावा. (जॉनी बेअरस्टो – 61,
मनीष पांडे – 34, यजुर्वेद्र चहल – 3-18, नवदीप सैनी – 2-25, शिवम दुबे – 2-15).