#IPL2019 : बंगळुरूचा चेन्नईवर एका धावेने विजय

बंगळुरू – अखेरच्या षटकांत चेन्नईला विजयासाठी 26 धावांची गरज असताना महेंद्रसिंग धोनीने केलेल्या 24 धावांमुळे चेन्नई विजयापासून 2 धावा तर बरोबरीपासून केवळ एका धावेने कमी पडल्याने बंगळुरूने थरारक विजय साजरा केला.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 161 धावांची मजल मारली.

प्रत्युत्तरात चेन्नईला 20 षटकांत 8 बाद 160 धावाच करता आल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी 162 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. चेन्नईचे पहिले चार गडी केवळ 27 धावांत परतल्यानंतर अंबाती रायडू आणि महेंद्रसिंग धोनी यांनी सावध खेळ करत चेन्नईचा डाव सावरला.

यावेळी मोठे फटके मारण्यापेक्षा सावध खेळल्याने चेन्नईची धावगती मंदावली. त्यामुळे मोठा फटका मारण्याच्या नादात रायडू 29 धावा करून परतल्याने चेन्नईला पाचवा धक्‍का लागलीच बसला तर रवींद्र जडेजाही चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. यानंतर ब्राव्हो देखील स्वस्तात परतल्यानंतर धोनीने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेत फटकेबाजी करायला सुरुवात केली.

अखेरच्या षटकात 26 धावांची गरज असताना धोनीने उमेश यादवच्या पहिल्या तीन चेंडूवर चौकार, षटकार आणि षटकार मारत 16 धावा केल्या. त्यानंतर दोन धावा आणि पुढच्याच चेंडूवर षटकार मारत सामना खेचून आणला. पण, अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना पार्थिवने ठाकूरला धावबाद करत सामना अवघ्या 1 धावेने जिंकून दिला.

तत्पूर्वी, बंगळुरूची सुरुवात खराब झाली. सलामीवीर विराट कोहली केवळ 9 धावा करून परतला. यानंतर डीव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांनी कुठलाही दबाव न येऊ देता फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे सहा षटकांमध्ये बंगळुरूला 49 धावांची मजल मारून दिली. तर, 6.2 षटकांत संघाचे अर्धशतक फलकावर लगावले.

संघाचे अर्धशतक फलकावर लागल्यानंतर डीव्हिलियर्स 25 धावा करून बाद झाला. डीव्हिलियर्स बाद झाल्यानंतर आलेल्या अक्षदीप नाथला साथीत घेत पार्थिवने संघाचा डाव सावरला या दोघांनी मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. त्यामुळे 12व्या षटकातच बंगळुरूने शंभरी पार केली. यावेळी अक्षदीप नाथ 24 धावावर परतला. यानंतर पार्थिवने डाव सावरायचा प्रयत्न केला. यावेळी पार्थिवने फटकेबाजी करत 36 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले.

मात्र, त्याच्या पुढच्याच चेंडूवर पार्थिव 53 धावा करून परतला. लागलीच स्टोयनिस बाद झाल्याने बंगळुरूचा संघ पुन्हा अडचणीत सापडला. यावेळी मोईन अली आणि पवन नेगी यांनी अखेरच्या षटकांमध्ये फटकेबाजी करत 19व्या षटकांत बंगळुरूला दीड शतकी मजल मारून दिली. यावेळी अखेरच्या षटकांत मोठे फटके मारण्याच्या नादात मोईन अली 26 धावा करून बाद झाल्याने बंगळुरूला 161 धावांचीच मजल मारता आली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.