#IPL2019 : पंजाबचा चेन्नईवर दणदणीत विजय

मोहाली – लोकेश राहुल, ख्रिस गेल आणि निकोलस पुरन यांनी केलेल्या फटकेबाजीच्या बळावर किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईसुपर किंग्जचा 12 चेंडू आणि सहा गडी राखून पराभव करत स्पर्धेचा विजयी समारोप केला. या पराभवाने चेन्नईच्या संघाला विशेष फरक पडला नसून ते अद्यापही क्रमवारीत अव्वल स्थानी आहेत.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 5 बाद 170 धावांची मजल मारत पंजाबसमोर विजयासाठी 171 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना पंजाबने हे आव्हान केवळ 18 षतकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात पुर्ण करत यंदाच्या मोसमाचा शेवट गोड केला.

चेन्नईच्या 171 धावांचा पाठलाग करताना पंजाबच्या ख्रिस गेल आणि लोकेश राहुल यांनी दमदार सुरुवात केली. यावेळी ख्रिस गेल संयमी फलंदाजी करत होता तर लोकेश राहुल आक्रमक पवित्र्यात फलंदाजी करत होता. यामुळे पंजाबने चौथ्या षटकातच धावफलकावर अर्धशतक लावले. यातील 46 धावांचा वाटा एकट्या लोकेश राहुलचा होता. त्याने 19 चेंडूतच आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने हरभजनच्या एकाच षटकात तब्बल 24 धावा वसूल करत संघाला आक्रमक टेम्पो मिळवून दिला. राहुलच्या या अर्धशतकाच्या जोरावर पंजाबने पॉवर प्लेमध्ये 68 धावा केल्या होत्या.

पॉवर प्ले संपल्यानंतर गेलने आक्रमक फलंदाजी करत ताहीरच्या षटकात 17 धावा वसूल केल्या. मात्र, त्यानंतर हरभजनने 71 धावांवर खेळत असलेल्या राहुलला बाद केले. तर, दुसऱ्याच चेंडूवर गेलला 28 धावांवर बाद करुन पंजाबच्या सलामीवीरींना माघारी धाडले. त्यानंतर आपल्या पुढच्याच षटकात मयांक अग्रवालला बाद करत हरभजनने पंजाबला तिसरा धक्‍का दिला. पॉवर प्लेमध्ये एका षटकात 24 धावा देणाऱ्या हरभजनने जबरदस्त पुनरागमन करत पाठोपाठ तीन फलंदाजांना बाद करत पंजाबच्या चमूत खळबळ माजवली.

सलग तीन विकेट पडल्याने पंजाबची धावगती मंदावली. मात्र, तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या पुरनने 36 धावांची आक्रमक खेळी करत पंजाबला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले. अखेर करनने विजयी चौकार मारत पंजाबला 6 गडी राखून विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. धडाकेबाज सलामीवीर शेन वॉटसन केवळ 7 धावा करून परतला. त्यामुळे चेन्नईला 30 धावांवर पहिला धक्‍का बसला. वॉटसन बाद झाल्यानंतर आलेल्या सुरेश रैनाला साथीत घेत फाफ ड्यु प्लेसिसने चेन्नईचा दाव सावरायला सुरुवात केली. यावेळी दोघांनीही फटकेबाजी करत पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये चेन्नईला 42 धावांची मजल मारुन दिली.

यावेळी फाफ ड्यु प्लेसिस आणि सुरेश रैना यांनी पॉवरप्लेच्या नंतर फटकेबाजी करायला सुरुवात करत संघाची धावगती वाढवण्यावर ब्य्हर दिल्याने चेन्नईने 10 षटकांत 79 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान, फाफ ड्युप्लिसिसने आपले अर्धशतक पूर्ण केले.

यावेळी प्लेसिसच्या फटकेबाजीने चेन्नईने 12.5 षटकांतच शतकी मजल ओलांडली. यानंतर सुरेश रैनानेही आपले अर्धशतक पूर्ण केले. कमी झालेली धावगती वाढवण्यासाठी दोघांनीही आक्रमक फलंदाजी करायला सुरुवात केली. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात रैना 53 धावा करून परतला.

रैना बाद झाल्यानंतर धोनी मैदानात आला. आता धोनी आणि ड्युप्लिसिस धावांचा पाऊस पाडणार असे वाटत असतानाच सॅम करनने चेन्नईला पुन्हा धक्‍का दिला. त्याने शतकाच्या उंबरठ्यावर असणाऱ्या ड्युप्लिसिसचा एका अप्रतिम यॉर्करवर त्रिफळा उडवला. प्लेसिसचे शतक अवघ्या 4 धावांनी हुकले. त्याने 55 चेंडूत 10 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 96 धावा केल्या. ड्युप्लिसिस बाद झाल्यानंतर फटकेबाजी करण्याच्या नादात रायडु आणि केदार जाधव असे दोन फलंदाज चेन्नईने गमावल्याने त्यांना 170 धावांचीच मजल मारता आली.

संक्षिप्त धावफलकसंक्षिप्त धावफलक

चेन्नई सुपर किंग्ज – 20 षटकांत 5 बाद 170 (फाफ ड्यु प्लेसिस 96, सुरेश रैना 53, महेंद्रसिंग धोनी नाबाद 10, सॅम करन 3-35, मोहम्मद शमी 2-17 ) पराभूत विरुद्ध किंग्ज इलेव्हन पंजाब 18 षटकांत 4 बाद 173 (लोकेश राहुल 71, ख्रिस गेल 28, निकोलस पूरन 36, हरभजन सिंग 3-57, रविंद्र जडेजा 1-16).

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.