#IPL2019 : दिल्लीचा राजस्थानवर धडाकेबाज विजय

जयपूर – शिखर धवन, पृथ्वी शॉ आणि ऋषभ पंतने केलेल्या फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सचा पाच चेंडू आणि सहा गडी राखून पराभव करत आगेकूच केली. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने निर्धारित 20 षटकांत 6 बाद 191 धावांची मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीने हे आव्हान 19.2 षटकांत 4 गड्यांच्या मोबदल्यात 193 धावा करत पूर्ण करत गुणतालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली.

यावेळी 192 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीच्या संघाने वेगवान सुरुवात केली. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घेत 10च्या सरासरीने धावा करत सहा षटकांत 72 धावांची सलामी दिल्यानंतर धवन 52 धावा करून परतला. तर कर्णधार श्रेयस अय्यर केवळ 4 धावावर परतला. मात्र, यानंतर आलेल्या ऋषभ पंत आणि पृथ्वी शॉ यांनी फटकेबाजी करत 7.5 षटकांत 84 धावांची भागीदारी केली. मात्र, यावेळी 46 धावा करून पृथ्वी परतला.
पृथ्वी बाद झाल्यानंतर ऋषभने फटकेबाजी चालूच ठेवत दिल्लीच्या विजयावर शिक्‍कामोर्तब केला. यावेळी ऋषभने 36 चेंडूत 78 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, राजस्थानची सुरुवात खराब झाली. संजू सॅमसन लवकर परतल्यानंतर आलेल्या कर्णधार स्टिव्ह स्मिथला साथीत घेत अजिंक्‍य रहाणेने राजस्थान डाव सावरला. यावेळी स्मिथपेक्षा रहाणे वेगाने खेळत होता. त्यामुळे त्याने आपले अर्धशतक झळकावत राजस्थानला 10 षटकांत 95 धावांची मजल मारून दिली.

रहाणे फटकेबाजी करत असताना दुसऱ्या बाजूने खेळणाऱ्या स्मिथनेही फटकेबाजी करायला सुरुवात केली. त्यामुळे दोघांनीही 10.2 षटकांतच राजस्थानला शतकी मजल ओलांडून दिली. स्टिव्ह स्मिथने फटकेबाजी करत 31 चेंडूतच लागोपाठ दुसरे अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर लागलीच तो बाद झाल्याने 135 धावांवर राजस्थानला दुसरा धक्‍का बसला. यावेळी स्मिथने 32 चेंडूत 50 धावांची खेळी करत अजिंक्‍य रहाणेच्या साथीत 130 धावांची भागीदारी केली.

स्मिथ बाद झाल्यानंतर आलेला ऍश्‍टॉन टर्नर एकही धाव न करता माघारी परतला. मात्र, रहाणेने आपली फटकेबाजी सुरू ठेवत 58 चेंडूत आपले शतक झळकावत राजस्थानला 191 धावांची मजल मारून दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.