#IPL2019 : हैदराबाद आणि चेन्नईमध्ये आज काट्याची टक्‍कर

चेन्नई सुपर किंग्ज Vs सनरायजर्स हैदराबाद
वेळ – रा. 8.00 वा.
स्थळ – एम. ए. चिदंबरम मैदान, चेन्नई

चेन्नई – आयपीएलच्या बाराव्या मोसमात प्ले ऑफमध्ये पोहोचण्यास केवळ एक पाऊल दूर असलेल्या चेन्नई सुपर किंग्ज समोर आज सनरायजर्स हैदराबादचे आव्हान असून आजचा सामना जिंकून प्ले ऑफमध्ये पोहोचण्यास चेन्नईचा संघ उत्सुक असून आजच्या सामन्यात विजय मिळवत आपल्या प्ले ऑफच्या आशा कायम ठेवण्याचे आव्हान सनरायजर्स हैदराबाद समोर असणार आहे.

यंदाच्या मोसमात पहिल्या सामन्यापासूनच विरोधी संघांवर वर्चस्व गाजवत प्ले ऑफच्या दिशेने दमदार वाटचाल करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला गत दोन सामन्यांमध्ये अपेक्षित कामगिरी करता न आल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या मोसमात चेन्नईने आपल्या आपल्या दहा सामन्यांपैकी सात सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे तर तीन सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांचे सध्या 14 गुण झालेले आहेत.

त्याचबरोबर चेन्नईने यंदाच्या मोसमात बंगळुरू, दिल्ली, राजस्थान, पंजाब, कोलकाता यांचा पराभव केला असून त्यांना मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्या विरोधात पराभवाचा धक्‍का बसला आहे. यावेळी गत काही सामन्यांपासून शेन वॉटसन, अंबाती रायडू आणि फाफ ड्यु प्लेसीस यांना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे. यामुळे सुरुवातीला वेगाने धावणाऱ्या चेन्नईला लागोपाठ दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात विजय मिळवायचा असल्यास चेन्नईच्या सलामीवीरांना चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

तर, दुसरीकडे सनरायजर्स हैदरबादच्या सलामीवीरांच्या कामगिरीमुळे हैदराबादच्या संघाने सुरुवातीपासून चांगली कामगिरी करत आपल्या नऊ सामन्यांपैकी 5 सामन्यात विजय मिळवत 10 गुण कमावले आहेत. मात्र, त्यांना 4 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला असून या चारही सामन्यांमध्ये चांगल्या सुरुवातीनंतर मधल्या फळीतील फलंदाजांनी केलेल्या खराब कामगिरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळी त्यांनी राजस्थान, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली आणि पंजाबच्या संघाचा पराभव केला असून त्यांना मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि पंजाब या संघांविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे.

प्रतिस्पर्धी संघ –

चेन्नई सुपर किंग्ज – महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), सुरेश रैना, फाफ डू प्लेसीस, मुरली विजय, रवींद्र जडेजा, सॅम बिलिंग्स, मिचेल सॅंटनर, डेव्हिड विली, ड्‌वेन ब्राव्हो, शेन वॉटसन, लुंगी एन्गिडी, इमरान ताहिर, केदार जाधव, अंबाती रायडू, हरभजन सिंग, दीपक चहर, के एम आसिफ, कर्ण शर्मा, ध्रुव शौरी, एन जगदीशन, शार्दुल ठाकूर, मोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड.

सनरायजर्स हैदराबाद – केन विल्यम्सन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, बसिल थम्पी, भुवनेश्‍वर कुमार, दीपक हुडा, मनिष पांडे, नटराजन, रिकी भुई, संदीप शर्मा, श्रीवत्स गोस्वामी, सिद्धार्थ कौल, सय्यद खलिल अहमद, युसूफ पठाण, बिली स्टॅनलेक, डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबी, राशिद खान, शाकीब अल-हसन, जॉनी बेयरस्टो, वृद्धिमान साहा, मार्टिन गुप्टिल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.