क्रिकेट काॅर्नर : प्ले-ऑफमुळे रंगत वाढली

-अमित डोंगरे

क्रिकेटमध्ये ते देखील टी-20 सामन्यांत प्ले-ऑफचा नियम जेव्हापासून आला तेव्हापासून खरी रंगत आली. यापूर्वी दोन उपांत्य सामने खेळवले जात होते व त्यात जिंकणारे संघ अंतिम सामना खेळत होते. आता या नव्या नियमामुळे स्पर्धेचे दिवस जरी वाढले असले तरी खरी रंगतही निर्माण झाली आहे.

लकबाय चान्स कोणत्याही संघाला मिळू नये व गुणवत्ता असलेलाच संघ विजयी व्हावा या विचारातूनच या प्ले-ऑफच्या नियमाचा उदय झाला. आयपीएल स्पर्धेत पूर्वी चार संघ उपांत्य फेरीत दाखल होत होते व त्यातील विजेते अंतिम सामना खेळत होते. हा नियम त्याआधीही अस्तित्वात आला होता.

न्यूझीलंडची रग्बी लीग व ऑस्ट्रेलियाच्या फुटबॉल लीगमध्ये प्ले-ऑफ सर्वप्रथम राबवण्यात आले व त्याची लोकप्रियताही वाढली. त्यातूनच 2011 सालापासून आयपीएलमध्येही हा नियम अवलंबिला गेला व कायमही राहिला.

या नियमापूर्वी जवळपास सर्वच खेळात उपांत्य सामने व अंतिम सामना अशीच रचना होती व त्यात कोणत्याही संघाला अनपेक्षित लॉटरी लागू नये हाच या नियमाचा हेतू आहे यात शंका नाही. कारण एखादा संघ संपूर्ण स्पर्धेत चांगला खेळ करतो व उपांत्य सामन्यात त्याला अपयश येते. या नियमात या संघाला आणखी एक संधी मिळते, त्यालाच क्वॉलिफायर व एलिमिनेटर असे संबोधले जात आहे. याआधी आयपीएल स्पर्धेत अंतिम सामना खेळण्यापूर्वी दोन सामने खेळवले जात होते.

प्ले-ऑफच्या नियमानुसार तीन सामने खेळवले जातात. पहिला क्वॉलिफायर, एलिमिनेटर व दुसरा क्वॉलिफायर. पहिल्या क्वॉलिफायरमधील सामना गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावरील संघ व दुसऱ्या क्रमांकाचा संघ यांच्यात होतो. यातील विजेता संघ थेट अंतिम सामन्यासाठी पात्र ठरतो. एलिमिनेटरचा सामना तिसऱ्या व चौथ्या क्रमांकांवरील संघात खेळवला जातो. त्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाद होतो.

क्वॉलिफायर दोनचा सामना हा एलिमिनेटरमधील विजयी संघ आणखी एक सामना खेळतो ज्याला क्वॉलिफायर म्हणतात. यात त्याचा सामना पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी होतो. यांच्यातील विजयी संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरतो. त्यामुळे पहिल्या क्वॉलिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत जाण्याची संधी मिळते. त्यानंतर या दोन संघात अंतिम लढत खेळवली जाते. म्हणजेच गुणतालिकेत पहिल्या दोन क्रमांकाच्या संघांना अंतिम सामन्यात स्थान निश्‍चित करण्यासाठी संधी मिळते व कोणत्याही संघाला अनपेक्षित लॉटरी लागत नाही.

स्पर्धेत सातत्याने ज्या संघांनी आपले वर्चस्व राखले आहे अशाच संघांना या गटात प्रवेश मिळतो. आयपीएल स्पर्धा प्रगती करत आहे, तसेच या नव्या नियमांमुळे त्याचा दर्जा व गुणवत्ता टीकून राहात आहे. यंदाच्या स्पर्धेत ज्या संघांनी प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतरच या गटात प्रवेश केला असल्याने कोणत्या संघाने जुगाड केला असेही म्हटले जाऊ शकत नाही.

बदल हा चांगला असतो पण तो वेळेवर स्वीकारला तरच त्याचा अंगीकार करणे सोपे ठरते. क्रिकेटच्या प्रगतीसाठी, गुणवत्तेसाठी बनवण्यात आलेले नियम आपलेसे केले तरच क्रिकेटची वाटचालही यशोशिखराच्या दिशेने होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.