हैदराबाद – चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला असून यंदाच्या मोसमातील हा त्यांचा दुसरा पराभव ठरला. या सामन्यात आपण धावा कमी केल्यामुळेच पराभूत झालो अशी कबुली धोनीच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुरेश रैनाने दिली आहे.
हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने 20 षटकांत 5 बाद 132 धावा केल्या तर सनराझर्स हैदराबादने 4 बाद 137 धावा करत सामना आपल्या नावे केला. यावेळी सामन्यानंतर बोलताना हंगामी कर्णधार रैना म्हणाला की, या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा आमचा न्निर्णय चुकला. त्यातच आमच्या फलंदाजांनी अतिरिक्त तणाव ओढावून घेतल्याने आम्हाला धावा करण्यात अपयश आले. या सामन्यात आम्ही कमीत कमी 160 धावा करायला पाहिजे होत्या. फलंदाजांनी एक-एक धाव करत चांगल्या धावांची भागीदारी करायला पाहिजे होती. हा सामना आमच्यासाठी वेकअप कॉल असून आमच्या संघाला फलंदाजीवर काम करणे गरजेचे आहे’
चेन्नई पुढचा सामना 21 एप्रिलला रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरोधात खेळणार आहे. या सामन्यापर्यंत तब्येत ठीक झाल्यास महेंद्रसिंह धोनीही खेळण्याची शक्यता आहे. 2010 नंतर पहिल्यांदाच धोनी चेन्नईचे नेतृत्व करत नसल्याची घटना घडली आहे. पाठीच्या दुखण्यामुळे धोनीने या सामन्यातून माघार घेतली होती.