आयपीएल स्पर्धेतील नफा एका व्यक्‍तीचा नव्हे

बीसीसीआय खजिनदार अरुण धुमाळ यांचे मत

मुंबई :- इंडियन प्रीमिअर लीगमधून (आयपीएल) मिळणारा पैसा अध्यक्ष सौरव गांगुली किंवा जय शहा यांच्यासाठी वापरला जात नाही तर, देशातील क्रिकेटपटूंसाठी व क्रिकेटच्या विकासासाठी वापरला जातो, अशा शब्दांत बीसीसीआयचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी स्पष्ट केले. या स्पर्धेतून होणारा नफा पदाधिकाऱ्यांवर खर्च केला जातो का, अशी खोचक विचारणा होत असल्याने धुमाळ यांनी आपले मत मांडले.

करोनाचा धोका वाढल्याने तसेच हा धोका अद्याप कायम असल्याने यंदाच्या आयपीएलचे आयोजन संकटात सापडले आहे. या स्पर्धेच्या आयोजनाबाबत सध्या चर्चा सुरू आहे. ही स्पर्धा भारतात घ्यावी का अन्य देशांत याबाबत अद्याप काहीही निश्‍चित झालेले नाही. तसेच ही स्पर्धा होणार की नाही याबाबतही अद्याप काहीच स्पष्ट झालेले नाही. ही स्पर्धा आयसीसीच्या आणि प्रायोजकांच्या भूमिकेवर अवलंबून आहे. त्यामुळे याबाबत आयसीसीचा निर्णय झाला की सर्व काही स्पष्ट होईल, असेही धुमाळ यांनी सांगितले.

येत्या ऑक्‍टोबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्‍वकरंडक स्पर्धा होत आहे. मात्र, या स्पर्धेच्या आयोजनाबाबत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने असमर्थता व्यक्‍त केली आहे. तसेच यंदाच्या आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला मिळालेले आहे. तसेच त्यांच्या पाकिस्तान सुपर लीग (पीसीएल) स्पर्धेतील काही सामने बाकी असल्याने या दोन्ही स्पर्धा पाकिस्तान आयोजित करण्यात उत्सुक आहे. त्यांना पीसीएल रद्द करून त्या जागी आशिया करंडक स्पर्धा घ्या व आयसीसीने टी-20 विश्‍वकरंडक रद्द केला तर त्या विंडोमध्ये आयपीएल आयोजित करता येईल अशी मागणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली आहे.

यंदाची आयपीएल रद्द करावी लागली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटी रुपयांचा तोटा होणार असून ही स्पर्धा भारतात किंवा परदेशात घेता येईल का याबाबत सध्या चाचपणी केली जात आहे. मात्र, एका स्पर्धेसाठी इतका खटाटोप कशासाठी असा प्रश्‍न क्रिकेटप्रेमींनी विचारला आहे. तसेच ही स्पर्धा आयोजित केल्यानंतर कोणाला लाभ होणार, असा खोचक सवालही करण्यात येत होता. त्यावर धुमाळ यांनी आपले मत मांडले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.