मुंबई – नवोदित सलामीवीर इशान किशन व धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादव याला आयपीएलच्या पुढील मोसमात रिटेन (संघात कायम ठेवणे) करता येणार नसल्यामुळे मुंबई इंडियन्सची चिंता वाढली आहे.
इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इशान किशनने पदार्पण करताना अर्धशतक फटकावले. सूर्यकुमारनेही रविवारच्याच सामन्यात पदार्पण केले होते. या दोघांचेही भारतीय संघाकडून खेळण्याचे स्वप्न खरे ठरले मात्र, आता मुंबई इंडियन्सच्या चिंतेत भर पडली आहे. कारण आयपीएलच्या नियमांनुसार आता मुंबई इंडियन्सला इशान आणि सूर्यकुमारला संघात कायम ठेवता येणार नाही.
आयपीएलचा नियम…
पुढच्या वर्षी आयपीएलचा पुन्हा लिलाव होणार आहे. त्याचबरोबर आयपीएलमध्ये अजून दोन संघ नव्याने जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी इशान आणि सूर्यकुमारला संघात कायम ठेवणे शक्य होणार नसल्याचे सांगितले जात आहे. आयपीएलचच्या नियमांनूसार एक संघ फक्त तीन भारतीय संघातील तीन आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच रिटेन करू शकतो.
त्याचबरोबर राइट टु मॅच कार्डच्या जोरावर त्यांना एक विदेशी आणि एक अनकॅप खेळाडूला संघात रिटेन करता येऊ शकते. त्यामुळे यापुढे मुंबई इंडियन्सला इशान किशन आणि सूर्यकुमार यादवला रिटेन करणे कठीण बनणार आहे. मुंबई इंडियन्सच्या संघात कर्णधार रोहित शर्मा, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अष्टपैलू हार्दिक पंड्या हे तीन आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत. त्यामुळे आणखी दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंना संघात रिटेन करता येणार नाही.