नवी दिल्ली – आयपीएल स्पर्धाचे दुसरे सत्र आठवभरावर असताना या स्पर्धेतून खेळाडूंनी माघार घेण्याचे सत्र सुरू झाले आहे. टी-20 क्रिकेटमधील नंबर 1 बॅट्समन आणि पंजाब किंग्जचा आघाडीचा खेळाडू डेव्हिड मलानने उर्वरित स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यापाठोपाठ इंग्लंडच्या आणखी दोन खेळाडूंनी माघार घेतली आहे.
या स्पर्धेतून सनरायझर्स हैदराबादचा यष्टीरक्षक व फलंदाज जॉनी बेअरस्टो आणि दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्स यांनीदेखील माघार घेतली असल्याची माहिती ब्रिटिश मीडियाने दिली आहे. यापैकी जॉनी बेअरस्टोची माघार हा सनरायझर्स हैदराबादसाठी मोठा धक्का मानला जात आहे. बेअरस्टोने आयपीएल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात 41.33च्या सरासरीने 248 धावा केल्या आहेत.
फॉर्मात असलेल्या बेअरस्टोला खेळवण्यासाठी सनरायझर्सने माजी कर्णधार डेव्हिड वॉर्नरला संघातूनच वगळण्याचा निर्णय घेतला होता. आता बेअरस्टोने माघार घेतल्याने वॉर्नर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
हैदराबादने आतापर्यतच्या 7 सामन्यांमध्ये फक्त 1 विजय मिळविला असून गुणतालिकेत ते सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत. गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या दिल्ली कॅपिटल्सलाही आयपीएल स्पर्धा सुरू होण्यापूर्वी धक्का बसला आहे. दिल्लीचा वेगवान गोलंदाज ख्रिस वोक्सने माघार घेतली आहे.
वोक्स दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. त्याने भारताविरुद्ध ओव्हल कसोटीमध्ये पुनरागमन केले होते. मात्र, वोक्सनेही आयपीएलमधून माघार घेतली आहे.
दरम्यान, फॉर्मातील खेळाडूची माघार मलान, बेअरस्टो आणि वोक्स यांनी आयपीएलमधून माघार घेतल्याने या स्पर्धेतील इंग्लंडच्या खेळाडूंची संख्या आता 10वर पोहोचली आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी माघार घेतलेली आहे.