मुंबई – आयपीएल-2022चा हंगाम रंगतदार स्थिती असतानाच बीसीसीआयने पुढील आयपीएलची तयारी सुरू केली आहे. या हंगामानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) प्रसारण हक्कांचा लिलाव करणार आहे. या लिलावात आता ऍमेझॉन आणि डिस्निनंतर गुगलही यात सामील झाले आहे. एकूण अर्धा डझन कंपन्यांनी बीसीसीआयकडून बोलीची कागदपत्रे मिळविली आहेत.
आयपीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय लीग आहे. या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील क्रिकेटपटू उत्सुक असतात. क्रिकेटचे नियमित सदस्य नसलेल्या देशांमध्येही आयपीएलच्या फॅन्सची संख्या मोठी आहे. आयपीएलची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन जगातील दिग्गज कंपन्यांनी यामध्ये रस दाखवला आहे.
बीसीसीआय 2023 ते 2027 या कालावधीसाठी प्रसारण हक्कांचा लिलाव करणार आहे. सध्या आयपीएलचे प्रसारण हक्क “स्टार स्पोर्टस’कडे आहेत. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, “अमेरिकी टेक कंपनी अल्फाबेट इंकने बीसीसीआयच्या प्रसारण हक्काच्या लिलावात सहभागी होण्यासाठी आवश्यक कागदपत्र खरेदी केले आहेत. या कंपनीकडे यूट्यूब हा व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म आहे.
अर्थात या कंपनीकडून याबाबत कोणताही अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.
दक्षिण आफ्रिकेतील टेलिव्हिजन चॅनेल सुपर स्पोर्टस समूहाने देखील कागदपत्र खरेदी केले आहेत. या सर्व कंपन्यांनी कागदत्रांची खरेदी केली म्हणजे त्यांना बोली लावाली लागेल, असा अर्थ होत नाही. त्यांना कोणत्याही टप्प्यात या लिलावातून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. आयपीएल स्पर्धेच्या प्रसराण हक्कासाठी ऍमेझॉन, द वॉल्ट डिस्ने, रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेड, सोनी ग्रुप कॉर्प, झी एन्टरटेन्मेंट, आणि ड्रीम 11 या कंपन्या सहभागी आहेत.
बीसीसीआयच्या आकडेवारीनुसार, आयपीएलच्या शेवटच्या हंगामात 60 कोटी प्रेक्षक जोडले गेले होते. भारतीय मनोरंजन बाजारपेठेत आयपीएलचा मोठा वाटा आहे. एका अंदाजानुसार, बीसीसीआयला आयपीएल लिलावातून सुमारे 32500 कोटी मिळू शकतात.