IPL : मुंबईतील सामन्यांबाबत गांगुली ठाम

मुंबई  – करोनाचा धोका वाढला असला तरीही यंदाच्या आयपीएल स्पर्धेचे मुंबईतील सामने होणारच, अशी ठाम भूमिका बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतली आहे. करोनाच्या वाढत्या धोक्‍यामुळे महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन तसेच अन्य दिवशी कठोर निर्बंधाचा लावण्यात आल्याने आयपीएलच्या मुंबईतील सामन्यांबद्दल संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, गांगुलीने या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

मुंबईसह राज्यात विकेंड लॉकडाऊन झाले असले तरीही ते स्पर्धेसाठी लाभदायकच ठरणार आहे. स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात येणार नसल्याने आम्हाला केवळ बायोबबलमध्ये असलेल्या लोकांवरच लक्ष केंद्रित करता येईल. त्यांची सतत चाचणी केली जात आहे. जेव्हा आपण बायोबबलमध्ये असतो, तेव्हा आपल्याला कोणताही धोका नसतो. गेल्या वर्षी अमिरातीत स्पर्धा सुरू होण्यापूर्वीही अशा काही घटना घडल्या. एकदा स्पर्धा सुरू झाल्यावर गोष्टी स्वतःच व्यवस्थित होतील, असे गांगुली म्हणाला.

बीसीसीआयला सरकारने मुंबईत सामने आयोजित करण्याची परवानगी दिली आहे. 10 ते 25 एप्रिल दरम्यान मुंबईत फक्‍त 10 सामने होणार आहेत. बायो बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. आमच्याकडे एक अतिशय सुरक्षित यंत्रणा आहे, जिथे खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ पूर्णपणे सुरक्षित आहेत. चार संघ आपले सलामीचे सामने मुंबईत खेळणार आहेत. त्यात चेन्नई सुपर किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत. यंदाची स्पर्धा अत्यंत सुरक्षीत वातावरणात पार पडेल, असा विश्‍वासही गांगुली यांनी व्यक्त केला.

सरकारच्या पुष्टीनंतरही अनिश्‍चितता

महाराष्ट्र राज्य सरकारने करोनाबाबतच्या अटी व शर्तींच्या पार्श्‍वभूमीवर या स्पर्धेच्या मुंबईतील सामन्यांना हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र, ज्या पद्धतीने सध्या राज्यात करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे ते पाहता सरकारच्या परवानगीनंतरही या सामन्यांबाबतची अनिश्‍चितता कायम राहिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.