आयपीएलच्या 16व्या हंगामाचा अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. रविवारी (२८ मे) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने येतील. जेव्हा दोन्ही संघ या सामन्यात उतरतील तेव्हा अनेक विक्रमही होतील. या मोसमातील सर्वाधिक धावा करणारा गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू शुभमन गिल याचं लक्षही अनेक विक्रम आपल्या नावावर करण्याकडे असेल.
शुभमन गिलने या मोसमात आतापर्यंत 16 सामन्यात 851 धावा केल्या आहेत. त्याने 16 डावात 60.79 च्या सरासरीने आणि 156.43 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत. शुभमनच्या नावावर तीन शतके आणि चार अर्धशतके आहेत. चेन्नईविरुद्धच्या अंतिम सामन्यात तो एका मोसमात 900 धावा पूर्ण करू शकतो. मात्र यासाठी शुभमनला 49 धावा कराव्या लागतील. जर त्याने हे केले तर विराट कोहलीनंतर एका मोसमात 900 किंवा त्याहून अधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठरेल.
शुभमन गिलला एका मोसमात 900 धावा पूर्ण करण्याची संधी तर आहेच, शिवाय विराट कोहलीचा विक्रम मोडण्याचीही संधी आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावे आहे. कोहलीने 2016 मध्ये आरसीबीसाठी 16 सामन्यात 973 धावा केल्या होत्या. कोहलीचा हा विक्रम मागे टाकण्यासाठी शुभमनला 123 धावा कराव्या लागतील.
आयपीएलच्या इतिहासात एका हंगामातील सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत गिल आता तिसऱ्या क्रमांकावर आहे. गिलने या हंगामात आतापर्यंत 851 धावा ठोकल्या आहेत. या यादीत विराट कोहली 973 धावा करून अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्सचा जॉस बटलर दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 2022 च्या हंगामात 17 सामन्यात 57.53 च्या सरासरीने 863 धावा केल्या होत्या.
….या बाबतीत कोहलीची बरोबरी करण्याची संधी
शुभमन गिल जेव्हा चेन्नईविरुद्ध मैदानात उतरेल तेव्हा त्याला आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवायला आवडेल. गेल्या चार सामन्यांत त्याने तीन शतके झळकावली आहेत. त्याने सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि मुंबई इंडियन्सविरुद्ध शतके झळकावली. केवळ चेन्नईविरुद्धच्या क्वालिफायर-1मध्ये त्याला हे करता आले नाही. शुभमनला ती पोकळी भरून काढायला आवडेल.
शुभमनला या मोसमात चौथे शतक झळकावण्याची संधी असेल. जर त्याने हे केले तर एका मोसमात सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत तो विराट कोहलीच्या विक्रमाची बरोबरी करेल. कोहलीने 2016 मध्ये सर्वाधिक चार शतके झळकावली होती.